ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात येते.
मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे टोपे यांनी सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे. मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे टोपे म्हणाले.
दरम्यान, मुंडे यांना पुढील तीन ते चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.