प्रतिनिधी/ म्हसवड
मंगळवेढा जय मल्हार क्रीडा युवक व सेवा मंडळ यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मंगळवेढा महिला केसरी स्पर्धेत यावर्षी खुल्या गटातून श्रीगोंदा येथील माणदेशी चॅम्पियनशिपची खेळाडू धनश्री फंड हिने सख्ख्या बहिणीलाच आस्मान दाखवत मंगळवेढा महिला केसरीची चांदीची गदा पटकावली. याबद्दल माणदेशी चॅम्पियन्सचे प्रमुख प्रभात सिन्हा, चेतन सिन्हा, विजय सिन्हा करण सिन्हा, रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे आदी आदीनी तीचे अभिनंदन केले.
मंगळवेढा केसरी कुस्तीचे जनक मारुती बापू वाकडे हे गेले 38 वर्षापासून कुस्ती स्पर्धा भरवत असून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला मंगळवेढा केसरी खुल्या गटाचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात श्रीगोंदाच्या भाग्यश्री फंड आणि धनश्री फंड या दोन सख्ख्या बहिणीमध्ये मंगळवेढा महिला केसरीची अंतिम झुंज लागली होती. या कुस्तीमध्ये दोन्ही बहिणींनी कुस्ती निकाली करत धनश्री फंड हिने मंगळवेढा महिला कुस्तीवर आपले नाव कोरले.
जयमल्हार क्रीडा युवक व सेवा मंडळ यांच्या संयोजनाने महिला मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धा 2023 या स्पर्धेचे उद्घाट्न प्रणाली सिद्धेश्वर अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेस विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी, यशोदा पतसंस्था चेअरमन नीलाताई आटकळे, शिक्षक पतसंस्था चेअरमन तेजस्विनी कदम, डॉ. प्रीती शिर्के, डॉ. इहानी मुलाणी, बलवान वाकडे, सुनील फडतरे आदी मान्यवर येथे उपस्थित होते.
धनश्री फंड ही माणदेशी चॅम्पियनशिप खेळाडू असून तिने बऱयाच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा जिंकून अनेक मेडल्स मिळवले आहेत.
नुकत्याच दिल्ली रोहटक येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये धनश्री फंड हिने 57 किलो वजन गटांमध्ये फायनलमध्ये हरियाणाची अंजली बरोबर 11-8 फरकाने पराभूत करत प्रथम क्रमांक मिळवला होता.
तिच्या या यशाबद्दल माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी धनश्रीचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.