Tarun Bharat

ढोल ताशातच दडला त्यांच्या जगण्याचा सूर

पापाची तिकटी गंगावेशीत रस्त्याकडेला पथकाचा मुक्काम

सुधाकर काशीद / कोल्हापूर

गणेशोत्सव सोहळ्यातील ढोल ताशा पथकामुळे सोहळ्याने जरूर सुर धरला आहे. पण मोठी, व व्यावसायिक ढोल पथके वगळता गेले पाच-सहा दिवस गंगावेश पापाची तिकटी येथे 50 हून अधिक ढोल ताशा पथके रस्त्याकडेलाच आपला तळ ठोकून आहेत. आपल्या जगण्याचा सूर सांभाळण्याची त्यांची ही सारी धडपड आहे. अगदी नाशिक जळगाव परिसरातूनही काही पथके कोल्हापुरात आले आहेत. पथकातील प्रत्येकाला या गणेशोत्सवातून किमान 15 ते 20 हजार रुपये मिळतील व त्यावर आपल्या कुटुंबाकरिता वर्षभराच्या काही जोडण्या करता येतील एवढीच त्यांची या मागची भावना आहे.

गणेशोत्सवाचे वाढते स्वरुप व वाद्यांचा वाढता वापर या पार्श्वभूमीवर अनेक नवीन तरुणांनी चार पैसे मिळवण्याची एक संधी म्हणूनही ढोल ताशा पथकांची उभारणी केली आहे. आपल्याला मिरवणुकीत संधी मिळावी म्हणून तरुण मंडळांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. आणि मोठय़ा मिरवणुकीची सुपारी घेण्यासाठी ते गंगावेश पापाची तिकटी येथे थांबून आहेत. दोन-तीन दिवस पडणाऱया पावसामुळे ढोलांचा आवाज क्षीण झाला आहे. पंधरा-वीस ढोल घेऊन रस्त्याकडे रस्त्याकडेला थांबणे त्यांना कठीण झाले आहे. पण ही एक संधी हातातून गेली तर पुढे काय ही चिंता त्यांना सतत सतावत राहणारी आहे.

गणेश चतुर्थी दिवशी गणेश प्रतिष्ठापना, हा पंचांगातला संदेश सध्या कोल्हापुरात तरी पंचांगातच बंद झाला आहे. कोल्हापुरात गणेश चतुर्थीच्या आधी तीन-चार दिवस व आता घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन उद्या येऊन ठेपले असले तरीही, अजून सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सुरुच आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या भागात किमान दहा-पंधरा मिरवणुका चालूच आहेत. अर्थात त्यामुळे ढोल ताशा पथकवाल्यांना चांगले काम मिळाले आहे. त्यांच्या दृष्टीने हीच कमाईची चांगली संधी आहे.

अर्थात ही कमाई लाखा दोन लाखात नक्कीच नाही. पथकात 15 ते 20 जण असतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था रोज करावी लागते. काही जण एखादे गॅरेज किंवा शेड तात्पुरते भाडय़ाने घेऊन तेथे राहतात. ढोल रचून ठेवतात. पण बहुतेक जण गंगावेश किंवा पापाची तिकटी येथे रस्त्याकडेलाच हातपाय पसरतात. उशाला एकावर एक रचलेले ढोल असतात. गणेशोत्सव जरूर एक धार्मिक सोहळा आहे. पण पूजा साहित्य, फुले, फळे, सजावट, विद्युत रोषणाई, सुगंधी द्रव्य, प्रसाद, वाजंत्रीवाले, उदबत्ती धूप विक्रेते त्या सर्वांच्या दृष्टीने ती एक व्यवसायाची संधीही असते. हीच संधी या ढोल ताशा वाल्यांनीही घेतली आहे. आणि या संधीत जगण्याचा एक सूर ते शोधत आहेत.
वाजवून घाम यायचाच बंद होतो…
आम्ही गेले पाच-सहा दिवस गंगावेशीच्या चौकात मुक्काम ठोकून आहोत. पाच, दहा, अकरा हजारात छोटय़ा मिरवणुकीची एखादी सुपारी मिळते. त्यामुळे प्रत्येकाच्या वाटय़ाला चार-पाचशे रुपये येतात. मोठय़ा मिरवणुकीसाठी 25 ते 50 हजार रुपये आम्ही घेतो. त्यावेळी प्रत्येकी दोन तीन हजार रुपये मिळतात. मिरवणुकीत वाजवून वाजवून घाम येतो. काही वेळाने घाम यायचाच बंद होतो. पण या हंगामात प्रत्येकी 20 ते 25 हजार रुपये मिळतात. तेवढेच वर्षभरात किरकोळ घर खर्चासाठी उपयोगी पडतात.
बजरंग जीवरे, ढोल ताशा वादक

Related Stories

कोल्हापूर : ‘हेल्पर्स’मधील वादामागे ‘अर्थ’‘कारण’!

Archana Banage

व्वा! उद्योगपती आनंद महिंद्राना कोल्हापुरच्या फोटोने घातली भुरळ, हा फोटो केला ट्विट

Archana Banage

जीवनावशक वस्तूंच्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध

Archana Banage

कबुतरांचा छंद, कायद्यात बंद…..

Archana Banage

गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात वाढ?

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

Archana Banage