चौदापैकी आठ नगरसेवकांच्या स्वाक्षऱया
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा तनुजा सतीश गावकर यांच्या विरोधात या नगरपालिकेच्या आठ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावाची नोटीस पालिका संचालनालयाकडे सादर केला असून डिचोली नगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यापासून राजकीय नाटय़ाला सुरुवात झाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर डिचोली नगरपालिकेत राजकीय घडामोडीना सुरुवात होणार याचा अंदाज होताच. निवडणुकीनंतर लगेच नगरपालिका मंडळाला एक वर्ष झाल्यानंतर आपला कार्यकाळ संपल्याने उपनगराध्यक्षा तनुजा गावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र राजीनामा मागे घेण्याच्या मुदतीत तनुजा गावकर यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. त्यामुळे त्या या पदावर अबाधित राहिल्या होत्या.
त्यानंतर राजकीय घडामोडी सुरूच होत्या. परंतु उपनगराध्यक्षा गावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सत्ताधारी गटाकडे आठ नगरसेवकांचे बळ एकत्रित नव्हते. ते जमवून अखेर या आठ नगरसेवकांनी या अविश्वास ठरावावर स्वाक्षऱया केल्या आणि तो सादरही केला.
या अविश्वास ठरावावर नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, नीलेश टोपले, अनिकेत चणेकर, सुदन गोवेकर, दीपा पळ, सुखदा तेली व रंजना वायंगणकर यांनी स्वाक्षऱया केल्या आहेत. गेल्या मार्च 2021 साली नगरपालिका निवडणुकीनंतर या नगरपालिकेवर दहा भाजप नगरसेवकांनी भाजपचे मंडळ स्थापन केले होते. परंतु हा अविश्वास ठराव आणताना याच गटातील चार जणांना बाहेर ठेवण्यात आले आहे. तर विरोधी गटातील सुखदा तेली व रंजना वायंगणकर यांना आपल्या गटात घेऊन आठ जणांचा गट केला आणि हा अविश्वास ठराव सादर केला.
सत्ताधारी आठ जणांच्या गटात समाविष्ट झालेल्या सुखदा तेली व ऍड. रंजना वायंगणकर या माजी आमदार नरेश सावळ यांच्या गटातील आहेत. सध्या या नगरपालिकेतील उपनगराध्यक्षा तनुजा गावकर, सतीश गावकर, रियाझ बेग, दीपा शिरगावकर, ऍड. अपर्णा फोगेरी व गुंजन कोरगावकर हे नगरसेवक विरोधी गटात राहिले आहेत.