वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2022-23 च्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गोल्डन बूटचा मानकरी ठरलेला ओडिशा एफसी संघातील फुटबॉलपटू दियागो मॉरिसियो याचा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभावेळी ओडिशा फुटबॉल क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ओडिशा फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष राज अटवाल यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे आभार मानले आहेत. राज्यातील फुटबॉल दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री पटनाईक यांनी नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे अटवाल यांनी म्हटले आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात मॉरिसियोने 21 सामन्यातून 12 गोल नोंदविले. तसेच या स्पर्धेतील विजेता एटीके मोहन बागान संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडू डिमिट्री पेट्राटोस यानेही 23 सामन्यातून 12 गोल नोंदविले. गोल्डन बूट पुरस्कारासाठी दियागो मॉरिसियोची निवड करण्यात आली. मॉरिसियोच्या शानदार कामगिरीमुळे ओडिशाने पहिल्यांदाच या स्पर्धेत प्ले ऑफसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती.