देशातील 75 जिल्हय़ांमध्ये सुविधा उपलब्ध : ऑनलाईन बँकिंगच्या सेवा ग्राहकांना मिळणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 75 डिजिटल बँकिंग केंद्रांचे अनावरण केले. या केंद्रांमध्ये वर्षातील 365 दिवस चोवीस तास बँकिंग सुविधा उपलब्ध असतील. या सुविधेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंगचा लाभ देशाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. या सेवेमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 75 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या अनावरणप्रसंगी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सामील झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशातील 75 जिह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट (डीबीयु) उभारण्याची घोषणा केली होती.
आज देशातील प्रत्येक एक लाख प्रौढ लोकसंख्येमागे बँक शाखांची संख्या जर्मनी, चीन आणि दक्षिण आफ्रिका सारख्या देशांपेक्षा जास्त आहे. बँकिंग सेवा दूरस्थ, घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आज, भारतातील 99 टक्केपेक्षा जास्त गावांमध्ये 5 किमीच्या आत कुठल्या ना कुठल्या बँक शाखा, बँकिंग संस्था किंवा बँकिंग मित्र असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आता डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून वित्तीय कामकाजाला अधिक वेग देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. डिजिटल बँक सेवेशी 24 बँका जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका, 12 खाजगी क्षेत्रातील बँका आणि एक वित्त बँक सहभागी असल्याचे सांगण्यात आले.
डिजिटल बँकिंग युनिटमधील सुविधा
डिजिटल बँकिंग केंद्रांमध्ये लोकांना आर्थिक व्यवहाराशी संबंधित विविध सुविधा उपलब्ध असतील. यामध्ये बचत खाते उघडणे, शिल्लक तपासणे, निधी हस्तांतरण, पासबुक छपाई, गुंतवणूक, कर्ज अर्ज, जारी केलेल्या धनादेशांचे पेमेंट थांबवण्याच्या सूचना, पेडिट आणि डेबिट कार्डसाठी अर्ज, कर आणि बिल भरणे अशा विविध सुविधांचा समावेश आहे.
आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत
डिजिटल बँकिंग केंद्रे ग्राहकांना बँकिंग उत्पादने आणि सेवांमध्ये प्रवेश सुलभ करतील. तसेच आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत होईल. याशिवाय, ते बँकिंगच्या डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन देतील आणि ग्राहकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात मदत करतील.
डिजिटल बँकिंगचे फायदे…
- डिजिटल बँकिंगचे फायदे आतापर्यंत केवळ 20 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचले आहेत. कोटय़वधी नागरिक अजूनही डिजिटल बँकिंग प्रणालीपासून दूर आहेत. आता हे लोकसुद्धा डिजिटल केंद्रांमधून बँकिंग सेवांचा लाभ घेतील.
- आधीच डिजिटल बँकिंग करणाऱया व्यावसायिक बँका आता डिजिटल बँक केंद्रेही चालवू शकतील. या बँका भौतिक असतील, म्हणजेच ग्राहक या केंद्रांमध्ये जाऊन आपल्या सेवांचा लाभ मिळवू शकतील.
- डिजिटल केंद्रांच्या माध्यमातून बँकांच्या सेवा शाखा सुरू न करता येणाऱया देशाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहोचतील. या सुविधेमुळे ग्राहक आणि व्यवसाय वाढवण्याची संधी बँकांना मिळणार आहे.