इंग्लंडच्या विद्यापीठाच्या संशोधनात दावा
इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, ट्विटर, रेडिट, लिंक्डइन यापैकी कुठल्या न कुठल्या सोशल मीडिया ऍपचा वापर बहुतांश लोक करत असतात. या ऍप्समुळे ते तणाव, एंग्झाइटी आणि नैराश्य यासारख्या मानसिक आजारांना बळी पडत आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी आरोग्यतज्ञ डिजिटल डिटॉक्सची संकल्पना पुढे करत आहेत.
इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ बाथच्या संशोधनात सोशल मीडियापासून केवळ एक आठवडय़ाचा ब्रेक संबंधिताच्या मानसिक आरोग्यात सुधारणा घडवून आणू शकतो असे दिसून आले आहे. म्हणजेच जर तुम्ही नैराश्य आणि एंग्झाइटीच्या लक्षणांना सामोरे जात असाल तर केवळ एक आठवडय़ात त्यांची तीव्रता कमी केली जाऊ शकते.
ज्याप्रकारे लोकांना मद्य आणि सिगारेटचे व्यसन लागते, त्याचप्रकारे व्हर्च्युअल जगतातह राहण्याची सवय होते. इच्छा असूनही यातून बाहेर पडता येत नाही. अशा स्थितीत तंत्रज्ञानाच्या मायाजालापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही काळासाठी डिजिटल सुटीवर जाण्याला ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हटले जाते.
संशोधकांनी या संशोधनात 18-72 वयोगटातील 154 लोकांना सामील केले आणि त्यांना दोन गटात विभागले. पहिल्या गटाला सोशल मीडियाच्या वापरापासून रोखले. तर दुसऱया गटाला सोशल मीडियाचा वापर करू दिला. एक आठवडय़ात प्रत्येक सदस्याने दररोज सरासरी 8 तास सोशल मीडिया ऍप्सचा वापर केला आहे. एक आठवडय़ानंतर सदस्यांच्या 3 चाचण्या घेण्यात आल्या. यात नैराश्य आणि एंग्झाइटीशी निगडित प्रश्न सामील होते.
एक आठवडय़ाचा ब्रेक घेणाऱया गटाचे आरोग्य वारविक-एडिनबर्ग मेंटल वेलबीइंग स्तरावर 46 वरून वाढत 55.93 झाल्याचे आढळून आले. तर नैराश्याची पातळी 7.46 वरून कमी होत 4.84 वर आली होती. केवळ एक आठवडय़ात पहिल्या गटाच्या लोकांचा मूड चांगला झाला आणि एंग्झाइटीचे लक्षणे कमी झाली. याचा अर्थ सोशल मीडियावरील छोटा ब्रेकही मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो असे संशोधक जेफ लँबर्ट यांनी म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये सोशल मीडियाचा वापर करणाऱयांची संख्या 2011 मधील 45 टक्क्यांवरून वाढत 2021 मध्ये 71 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर 16-44 वयोगटातील 97 टक्के लोक सोशल मीडिया ऍप्सचा वापर करत आहेत.