ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) ट्विस्ट आला आहे. ऐनवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांची अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एन्ट्री झालीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे होतं. पण राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर परिस्थिती बदलली आणि दिग्विजय सिंह आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. आज काँग्रेस कार्यालयात ते उमेदवारी अर्ज घेण्यासाठी दाखल झाले. आपण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. ते उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज त्यांनी पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला. शशी थरूर हेही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे सध्या तरी शशी थरूर यांच्या विरोधात दिग्विजय सिंह हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत दिसत आहेत.
हे ही वाचा : अविवाहित महिलांना २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्यास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
अध्यक्षपदासाठीची लढत ही तिरंगी होईल की दोघांमध्ये होईल? असे जेव्हा दिग्विजय सिंह यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख म्हणजेच ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहा, असं उत्तर दिलं. तसेच, आज मी इथे माझा उमदेवारी अर्ज घेण्यासाठी आलोय आणि उद्या अर्ज दाखल करणार आहे. असंही यावेळी त्यांनी सांगितलं.