वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार तसेच आंतरराष्ट्रीय हॉकीपटू दिलीप तिर्की यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात भुवनेश्वर आणि रुरकेला येथे होणाऱया पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी दिलीप तिर्की यांचे भारतीय संघाला बहुमोल मार्गदर्शन मिळू शकेल.
हॉकी इंडियाची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती, पण या संघटनेच्या नव्या कार्यकारी पदांसाठी कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. उत्तरप्रदेश हॉकी संघाचे प्रमुख राकेश कटय़ाल तसेच हॉकी झारखंडचे भोलानाथ सही यांनी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठीची आपली नावे मागे घेतल्याने दिलीप तिर्की यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दिलीप तिर्की यांनी आपल्या हॉकी कारकिर्दीत तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी 412 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.