वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार आणि ऑलिम्पिक हॉकीपटू दिलीप तिर्कीने रविवारी आपला अर्ज दाखल केला आहे. भारतीय हॉकी क्षेत्राचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आपले यापुढेही प्रयत्न राहतील असे तिर्कीने यावळी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
ओदिशा हॉकी संघटनेच्यावतीने दिलीप तिर्कीने अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला आहे. आपल्या वैयक्तिक हॉकी कारकीर्दीमध्ये दिलीप तिर्कीने भारतीय हॉकी संघाला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदके मिळवून दिली आहेत. 1998 ची बँकॉक तसेच 2012 च्या बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकाविले होते. या संघामध्ये दिलीप तिर्कीचा समावेश होता. त्याचप्रमाणे 2003 साली कौलालंपूर येथे झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आणि 2007 साली चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दोन सुवर्णपदके मिळविली होती. 1999 च्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कास्यपदक घतले होते. या सर्व स्पर्धांमध्ये दिलीप तिर्कीचा भारतीय संघात समावेश होता.
हॉकी इंडियाची ही आगामी निवडणूक 1 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीवेळी बिहार शासनाचे अजय नायक हे प्रमुख निर्वाचन अधिकारी राहतील. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत रविवारी संपुष्टात आली आहे. 44 वर्षीय दिलीप तिर्कीची बिजू जनता दलातर्फे राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.