मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती मिळाली. केंदीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी न्यायमूर्ती दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केल्याची घोषणा केली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 28 होणार आहे. भारताच्या सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण क्षमता 34 इतकी आहे.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मी त्यांना कायदा मंत्रालयाच्यावतीने शुभेच्छा देतो, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय कायदामंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात 2030 पर्यंत कार्यकाळ
9 फेब्रुवारी 1965 रोजी जन्मलेले न्यायमूर्ती दीपांकर दत्ता सध्या 57 वर्षांचे असून त्यांचा सर्वोच्च न्यायालयात 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत कार्यकाळ मिळेल. तत्कालीन सरन्यायाधीश यु. यु. लळीत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांनी प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात घटनात्मक आणि दिवाणी प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा दिला आहे. 22 जून 2006 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली होती.