सातारा: काँग्रेसची सध्याची अवस्था पाहिली असता कुठे तो पक्ष, कुठे आहे ते चिन्ह, कुठे आहेत ते कार्यकर्ते, सगळे कसे डळमळीत झाले आहे. हा पक्षाचा डळमळीतपणा घालवायचा असेल तर निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या पाहिजेत, अशा शब्दात आपल्या भावना दिग्दर्शक, अभिनेते तेजपाल वाघ (Tejpal Wagh) यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, वाई तालुक्यात चुकीची माहिती वरिष्ठांना देऊन स्वतःचा स्वार्थ साधला जात आहे. हे यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे (Jaideep Shinde)यांनी वाई तालुक्यातील तथाकथित नेत्यांना दिला.
वाई येथील मथुरा गार्डन येथे काँग्रेसची (Congress)बैठक आगामी वाई पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पक्ष निरीक्षक मनोहर शिंदे, संदीप चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. अल्पना यादव, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, माजी उपसभापती सुनील आप्पा बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तेजपाल वाघ म्हणाले, 1994 सालापासून काँग्रेसचा मी कार्यकर्ता आहे. भिमराव शिंदे हे माझे आजोबा आहेत. त्यांच्यामुळे माझ्या रक्तात काँग्रेस भिनलेली आहे. आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही. खूप प्रलोभने आली तरीही जाणार नाही. मी शिक्षण घेत असताना मलकापूर ग्रामपंचायतीची निवडणूक मनोहर भाऊ लढवत होते. त्यावेळी मदनदादांकडून विमान तिकीट आणलं होते. त्यावेळी मी प्रचारात होतो. त्यावेळी पाहिले नव्हते की हा माणूस कोणत्या पक्षाचा आहे ते. सध्याचे वातावरण डळमळीत झाले आहे. काँग्रेसला उभारी आणायची असेल तर पक्षाच्या चिन्हावर निवडणूका लढवाव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.
जयदीप शिंदे म्हणाले, वाई नगरपालिकेत माझे वडील नगरसेवक म्हणून निवडून आले होते. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझे वडील काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. प्रदेश युवक काँग्रेसवर मी निवडून आलो आहे. काँग्रेस पक्षाचे काम मी अहोरात्र मेहनत घेऊन करत आलो आहे तरी मला डावलले जात आहे.
हेही वाचा- SANGLI; जाडरबोबलाद येथे वाहन चालकाचा ठेचून खून, खुनाचे कारण अस्पष्ट
वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी वाई तालुका काँग्रेस पक्षात काही लोक फुकटचे श्रेय लाटण्यात पटाईत झाले आहेत. वाई तालुक्यातील सक्षम कार्यकर्त्यांना डावलून स्वतःचे मर्जीतले बोलके पोपट बरोबर घेऊन न केलेल्या कामाचे ढोल वाजवत आहेत. तालुका पातळीवरील वस्तुस्थिती वरिष्ठांना कळू दिली जात नाही. त्यांच्याकडे चुकीची माहिती देऊन वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल केली जात आहे. 40 ग्रामपंचायती आणि 10 सोसायट्या ताब्यात आहेत अशी खोटी माहिती देऊन फुशारक्या मारणाऱ्या तथाकथित व्यक्तींनी विनाकारण आमदारकीची स्वप्न बघायला भाग पाडू नये. यापुढे अशा बालीश हरकती खपवून घेतल्या जाणार नाहीत वेळ पडल्यास हिसका दाखवला जाईल, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा- मुंबईसाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु करा; नागरीकांची मागणी
जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन यापुढे वस्तुस्थिती वरिष्ठांना कळवली जाईल याची खात्री दिली. पक्ष निरीक्षक मनोहर भाऊ शिंदे यांनी आगामी निवडणुका चिन्हावर लढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने तयारीला लागावे असे आवाहन केले. तेजपाल वाघ यांनी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आगामी निवडणुका चिन्हावर लढवाव्यात अशी मागणी केली. बावधनचे विलास बापू पिसाळ, प्रताप यादव, प्रदीप जायगुडे, राजेंद्र पाडळे, काशिनाथ पिसाळ, सचिन काटे, विशाल डेरे, गणेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रताप देशमुख यांनी केले तर आभार अतुल सपकाळ यांनी मानले.

