प्रतिनिधी /मडगाव
मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स क्रेडीट कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटी मंडळाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेऊन दुसऱयांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबाजी सावंत यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना संस्थेच्या कामकाजाची आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत पतसंस्थेचे सचिव संदीप रेडकर, संचालक आणि मुरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक तुळशीदास देसाई, डॉ. गुणाजी देसाई, सरिता फर्नांडिस, मारुती देसाई, उमेर मुत्तावली तसेच सुदेश गावकर यावेळी उपस्थित होते.
सध्या सोसायटीचे मडगाव येथे मुख्यालय असून काणकोणात पतसंस्थेचा विस्तारीत कक्षही आहे. हल्लीच सहकारी संस्थेच्या निबंधक कार्यालयाकडून मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स क्रेडीट कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटी मंडळाला केपे आणि मुरगाव येथे विस्तारीत काऊंटर सुरू करण्याची मंजुरीही मिळाल्याचे यावेळी चेअरमन सावंत यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सांगितले. सोसायटीचे व्यवस्थापन चांगले असल्याबद्दल आणि सोसायटीचा आलेख नेहमीच उंचावत असल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स क्रेडीट कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटी मंडळाच्या संचालक मंडळाचे तसेच भागधारकांचे अभिनंदन केले.