पुणे / प्रतिनिधी :
‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणा’च्या (म्हाडा) पेपरफुटी प्रकरणात जळगाव येथील ‘प्लेसमेंट एजन्सी’च्या संचालक वकिलाला गुरुवारी सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या वकिलाच्या ‘प्लेसमेंट एजन्सी’तून ‘म्हाडा’ परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना फोन करून, ‘आपल्या म्हाडा परीक्षेमध्ये नोकरीचे काम करायचे असल्यास ऑफिसला येऊन भेटा,’ असे सांगितले जात होते.
विजय बाबूलाल दर्जी (वय ४२, रा. जळगांव) असे या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणात ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी’ कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्यासह बारा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती.