वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये नुकतेच राजद आणि संजदचे युती सरकार स्थानापन्न झाले आहे. राज्यात सीबीआयला चौकशी करण्याचा अधिकार देण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आता समोर येत आहेत. राजद नेते शिवानंद तिवारी यांनी राज्यात सीबीआयला विनाअनुमती चौकशी करण्याचा अधिकार देऊ नये, अशी मागणी केली आहे. मात्र, काही संजद नेत्यांनी या विधानाला विरोध केला आहे.
संजद नेता उपेंद्र कुशवाह यांनी शिवानंद तिवारी यांच्या विधानासंबंधी दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही बैठक न झाल्याचे सांगितले आहे. शिवानंद तिवारी यांनी अपुऱया माहितीच्या आधारावर विधाने केली आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीबीआय चौकशीसंदर्भात युतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसेच विनाअनुमती सीबीआय चौकशीला विरोध करण्याच्या मुद्दय़ावर कोणतेही विचारमंथन झालेले नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न संजदकडून करण्यात आला. तथापि, काही राजद नेते या मागणीवर अद्यापही ठाम आहेत.