टी-20 विश्वचषक स्पर्धा : भारताचा 10 गडय़ांनी धुव्वा, हॅलेस-बटलरची नाबाद अर्धशतके, जॉर्डनचे 3 बळी, हार्दिक, कोहलीची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था /ऍडलेड
इंग्लंडने पूर्णपणे व्यावसायिक खेळाचे सफाईदार प्रदर्शन करीत टी-20 विश्वचषक स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात भारताचा दहा गडय़ांनी एकतर्फी धुव्वा उडवित दिमाखात अंतिम फेरी गाठली. रविवारी जेतेपदासाठी त्यांची लढत पाकिस्तानशी होईल. 47 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावणाऱया ऍलेक्स हॅलेसला सामनावीराचा बहुमान मिळाला. पराभवामुळे भारतीयांचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे.
या स्पर्धेत भारताच्या तुलनेत इंग्लंडची कामगिरी फारशी प्रभावी झाली नव्हती. पण महत्त्वाच्या उपांत्य लढतीत त्यांनी शानदार कामगिरी करीत सामना एकतर्फी करून टाकला. प्रथम गोलंदाजांनी अप्रतिम मारा करीत भारताला 20 षटकांत 6 बाद 168 धावांवर रोखले. त्यानंतर गोलंदाजांच्या कामगिरीला पूरक साथ देत फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करून 24 चेंडू बाकी ठेवत इंग्लंडला 16 षटकांतच बिनबाद 170 धावा जमवित विजय मिळवून दिला. इंग्लंडतर्फे ही विक्रमी भागीदारी आहे. भारताच्या डावात हार्दिक पंडय़ा (33 चेंडूत 63) व विराट कोहली (40 चेंडूत 50) यांनी अर्धशतके नोंदवली तर भारतीय गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
बटलर-हॅलेसचा आक्रमक प्रारंभ
169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार व सलामीवीर जोस बटलरने (नाबाद 80) भुवनेश्वरच्या पहिल्या षटकात तीन चौकार ठोकून आक्रमक सुरुवात करून दिली. पण हॅलेसने भारतीय गोलंदाजांची अक्षरशः कत्तल करीत नाबाद 86 धावा झोडपल्या आणि 16 षटकांतच इंग्लंडला विजयाचे उद्दिष्ट गाठून दिले. या स्पर्धेत पहिल्यांदाच इंग्लंडच्या या जोडीने चमकदार प्रदर्शन केले. या दोघांनी स्टार फलंदाजांचा भरणा असलेल्या भारतीय फलंदाजी लाईनअपला टी-20 मध्ये डावाची उभारणी कशी करावी, याचा जणू धडाच दिला. आक्रमण हा एकमेव उपाय येथे फायदेशीर ठरतो, हेच त्यांनी दाखवून दिले. पॉवरप्लेमध्ये सामन्याचा निकाल स्पष्ट होणारा हा पहिलाच सामना होता. भारताने पॉवरप्लेमध्ये 38 धावा जमविताना अतिसावध पवित्र्यावर भर दिला तर त्याचवेळी इंग्लंडने प्रारंभापासूनच आक्रमक धोरण स्वीकारत 6 षटकांत 63 धावा फटकावल्या. हॅलेसने 47 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार व 7 षटकार ठोकले. त्याच्या ऍप्रोचवरून खेळपट्टीत भयावह वाटेल असे काहीच नव्हते, हे स्पष्ट झाले. लंकेचा माजी फलंदाज सनय जयसूर्याचा फॉर्म्युला वापरत त्याने पॉवरप्लेमध्येच जबरदस्त फटकेबाजी करून घेतली. नंतर ती पुढेही चालू ठेवली. त्यामुळे इंग्लंडसमोर 169 धावांचे आव्हान फारसे अवघड ठरले नाही.
भारतीय मारा निष्प्रभ
भुवनेश्वर व अर्शदीप यांना पुरेसा स्विंग मिळाला नाही तर चहलऐवजी अक्षर पटेल व आर. अश्विन यांना खेळविण्याचा जुगारही भारताला अंगलट आला. इंग्लंडचा स्पिनर आदिल रशिदने (4 षटकांत 20 धावांत 1 बळी) अप्रतिम कामगिरी केली. पण त्याच खेळपट्टीवर पटेल-अश्विन यांना चमक दाखविता आली नाही. याशिवाय भारताचे क्षेत्ररक्षणही खराब झाले, काही झेल सुटले तर काहीवेळा मिसफिल्ड झाले.
हार्दिकची फटकेबाजी
भावी कर्णधार हार्दिक पंडय़ाने मात्र सनसनाटी खेळी करीत भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. कोहलीनेही स्पर्धेतील चौथे अर्धशतक नोंदवत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या 10 षटकांत 63 धावा जमविल्यानंतर भारताने शेवटच्या चार षटकांत 58 धावा फटकावल्या, त्यात हार्दिकचाच प्रमुख वाटा होता. त्याने 5 षटकार व चार चौकार मारले. इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 43 धावांत 3 बळी टिपले तर रशिदने सूर्यकुमारचा महत्त्वाचा बळी टिपला. सूर्याला 10 चेंडूत 14 धावा जमविता आल्या. केएल राहुल (5) पुन्हा अपयशी ठरला तर रोहितने 28 चेंडूत 27 धावा जमविल्या. रिषभ पंत 6 धावांवर धावचीत झाला.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 6 बाद 168 : राहुल 5, रोहित शर्मा 27 (28 चेंडूत 4 चौकार), कोहली 50 (40 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार 14 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा 63 (33 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), पंत 6, अवांतर 3. गोलंदाजी : जॉर्डन 3-43, वोक्स 1-24, रशिद 1-20, करन 0-42.
इंग्लंड 16 षटकांत बिनबाद 170 : बटलर नाबाद 80 (49 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), हॅलेस नाबाद 86 (47 चेंडूत 4 चौकार, 7 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी : अक्षर पटेल 0-40, भुवनेश्वर 0-25, अर्शदीप 0-15 शमी 0-39, अश्विन 0-27, हार्दिक पंडय़ा 0-34.
4000 धावा करणारा कोहली पहिला फलंदाज
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीवेळी त्याने हा माईलस्टोन गाठला. त्याने 50 धावा करीत या स्पर्धेत एकूण 296 धावा जमविल्या. 6 डावांत त्याने 98.66 च्या सरासरीने या धावा जमविल्या. त्याच्या आता एकूण 4008 धावा झाल्या आहेत. त्यात 37 अर्धशतके, एका शतकाचा समावेश आहे. रोहित शर्मा (3853) दुसऱया, मार्टिन गप्टिल (3531) तिसऱया, बाबर आझम (3323) चौथ्या, आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (3181) पाचव्या स्थानावर आहेत.
ऍडलेडवर कोहलीच्या सर्वाधिक धावा
ऍडलेड मैदान हे कोहलीसाठी लकी मैदान ठरले असून या मैदानावर तो आता सर्वाधिक धावा जमविणारा विदेशी खेळाडू बनला आहे. याआधी विंडीजच्या ब्रायन लाराच्या नावावर हा विक्रम होता. या मैदानावर कोहलीच्या आता 11 सामन्यातील 15 डावांत 73.61 च्या सरासरीने 957 धावा झाल्या आहेत. त्यात 5 शतके, 4 अर्धशतकांचा समावेश असून 141 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. लाराने 11 सामन्यातील 15 डावात 67.14 च्या सरासरीने 940 धावा जमविल्या होत्या. त्यात 3 शतके, 3 अर्धशतकांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाच्या पाँटिंगने या मैदानावर सर्वाधिक 2188 धावा जमविल्या आहेत. 32 सामन्यातील 46 डावांत 53.38 च्या सरासरीने या धावा जमविताना त्याने 7 शतके व 10 अर्धशतके नोंदवली आहेत. 242 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.