लोकांची मनोकामना करत होती पूर्ण
जर्मनीच्या बवेरियामध्ये कांस्ययुगातील एका ऐतिहासिक विहिरीचा पुरातत्व तज्ञांनी शोध लावला आहे. ही विहिर सर्वसाधारण नसून इच्छापूर्ती करणारी विहिर आहे. ही विहिर सुमारे 3 हजार वर्षे जुनी आहे. या विहिरीत 100 हून अधिक प्राचीन कलाकृती सापडल्या आहेत.
नदी आणि विहिरींमध्ये नाणी टाकून इच्छा व्यक्त केली जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले असेल. नदी, तलाव किंवा विहिरींमध्ये नाणी टाकून इच्छा मागितल्यास ती पूर्ण होते अशी भारतात मान्यता आहे. बवेरियामध्ये देखील प्रथा-परंपरेमुळेच या विहिरीची निर्मिती करण्यात आली होती. पुरातत्व तज्ञांना या विहिरीतून अनेक कलाकृती मिळाल्या असून यात 70 हून अधिक संरक्षित मातीची भांडी सामील आहेत. ही दैनंदिन वापरासाठीची भांडी नसून त्यांचा वापर विशेष प्रसंगी केला जात होता. याचबरोबर पुरातत्व तज्ञांना विहिरीतून दोन डझनाहून अधिक कांस्य धातूने तयार कपडय़ांसाठीचे पिन, एक कंकण, चार अम्बर मोती, प्राण्याचा दात आणि लाकडी स्कूप हस्तगत झाला आहे.
3 हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकून राहणारी विहिर अत्यंत दुर्लभ असल्याचे पुरातत्व तज्ञ जोचेन हॅबरस्ट्रोह यांनी सांगितले आहे. हॅबरस्ट्रोह हे बवेरियन स्टेट ऑफिस फॉर मॉन्यूमेंट कॉन्झर्व्हेशनमध्ये पुरातत्व तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. विहिरीत लावण्यात आलेल्या लाकडी भिंती जमिनीवर पूर्णपणे संरक्षित आहेत. या भिंती भूजलामुळे नाममात्रच ओल्या झाल्या आहेत. याचमुळे विहिरीतील कलाकृती सुरक्षित असल्याचे जोचेन यांनी सांगितले.
या कलाकृतींचा आणि विहिरीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला जात आहे. या सामग्रीतून संबंधित काळातील दैनंदिन जीवनाबद्दल अधिक समजून घेता येणार आहे. स्वतःच्या प्रथेमुळेच त्या काळात लोकांनी या वस्तू विहिरीत ठेवल्या असतील असे संशोधकांचे मानणे आहे.
चांगले पीक यावे म्हणून ही सामग्री विहिरीत ठेवली जात असावी. विहिर असलेल्या ठिकाणी एका वितरण केंद्राची निर्मिती करण्यात येणार होती, याचकरता डिसेंबरमध्ये तेथे खोदकाम करण्यात आले होते. पुरातत्व तज्ञांनी 2021 पासून कांस्य युग तसेच प्रारंभिक मध्ययुगाशी संबंधित 13,500 हून अधिक कलाकृतींचा शोध लावला आहे. या विहिरीतून मिळालेल्या सामग्रीचे अध्ययन बवेरियन स्टेट ऑफ फॉर मॉन्यूमेंट कॉन्झर्व्हेशनचे संशोधक करत आहेत.