तुर्कीयेतील प्राचीन किल्ल्यात सापडले मंदिर
तुर्कीयेच्या पुरातत्व विभागाच्या एका पथकाला किल्ल्यातील उत्खननादरम्यान प्राचीन काळातील एक मंदिर सापडले आहे. या मंदिराचा संबंध राजा मेनुआशी असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व तुकिर्येच्या वान जिल्हय़ातील प्राचीन किल्ल्यान उत्खनन केले जात आहे. पुरातत्व विभागाला राजा मेनुआशी संबंधित आणखी एक मंदिर यापूर्वी सापडले आहे.
तर प्राचीन किल्ल्याचे आधुनिक तुर्कियेतील नाव ‘कोरजुत’ आहे. हा किल्ला ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात तयार करण्यात आला होता. या किल्ल्याची निर्मिती राजा मेनुआने करविली होती. पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान किल्ल्यात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सापडल्या आहेत. तुर्कियेच्या संस्कृती तसेच पर्यटन मंत्रालयाच्या अनुमतीनंतर किल्ल्यात उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते आणि ते अद्याप सुरू आहे.
या पुरातत्विक उत्खननासाठी तुर्कियेच्या सरकारकडून निधी पुरविण्यात येत आहे. किल्ल्यातील हे उत्खनन वान युजुंकू यिल विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्राध्यापक सबाहत्तिन अर्दोआन यांच्या नेतृत्वात केले जात आहे. किल्ल्यात आढळून आलेले हे मंदिर कोरबेलिंग तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले आहे. या मंदिरात मातीच्या भांडय़ांचे तुकडे आणि धातूद्वारे तयार करण्यात आलेली जुनी सामग्री सापडली आहे.
हिवाळय़ामुळे काम रोखले
कडाक्याच्या हिवाळय़ामुळे किल्ल्यातील उत्खननाचे काम रोखण्यात आले आहे. थंडीची लाट ओसरताच उत्खननाचे काम पुन्हा सुरू केले जाणार आहे. उत्खननादरम्यान आम्हाला आणखी एक मंदिर मिळाले, हे मंदिर राजा मेनुआने तयार करविले होते, आम्हाला मंदिरानजीक एक मकबरा देखील मिळाला आहे. या क्षेत्रातून मोठय़ा संख्येत प्राचीन काळातील भांडीही सापडली आहेत. उत्खननासाठी हे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. मिळालेली भांडी मध्यकालीन आहेत, याचबरोबर किल्ल्याबाहेर एक दफनभूमीही मिळाली असल्याचे अर्दोआन यांनी म्हटले आहे.