Tarun Bharat

विवेकनिष्ठ भावोपचार पद्धत..आरइबीटी

मॅडम, खरंच दृष्टिकोनामुळे एवढा फरक पडतो? इतकी किमया असते का दृष्टिकोनाची.’ टीन एजर मीराच्या मनामध्ये विचार, भावना, दृष्टिकोन याविषयी अनेक प्रश्न होते. तिच्या दोन मैत्रिणी. दोघींचा प्रेमभंग झाला. एक पार दुःखात बुडून गेली. चर्चेचे दरवाजेच तिने बंद करून घेतले तर एकीने स्वतःला सावरले. तसे पहायला गेले तर प्रेमभंग हे समान कारण होते. मग दोघींच्या प्रतिक्रिया अशा भिन्न टोकाच्या कशा असू शकतात हा प्रश्न घेऊन मीरा आली होती. तिच्या बाबतीतही असे काही घडले तर काय होईल हा विचारही तिला अस्वस्थ करत होताच. चर्चेमधून वेगवगळय़ा उदाहरणातून मीराला दृष्टिकोनाचे महत्त्व पटायला मदत झाली. विविध उदाहरणे देत दृष्टिकोन कसा किमयागार असतो हे मीराच्या लक्षात आले.

माणूस सभोवताली घडणाऱया घटनांमुळे किंवा व्यक्तींमुळे प्रक्षुब्ध होत नसतो तर ज्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे तो बघतो त्यामुळे अस्वस्थ होत असतो. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर प्रतिक्रियाही अवलंबून असते.

समजा तीन मुले बारावीला नापास झाली. पहिला मुलगा नैराश्याने ग्रासला जाऊन आत्महत्या करतो, दुसरा शिक्षणच सोडून देतो आणि दुसरा कामाला लागतो तर तिसरा खचून न जाता आपल्याला अपयश का आले, आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन खूप मेहनत घेतो आणि पुढील परीक्षेत उत्तम गुण मिळवतो. पहा हं, इथे नापास होणे या एकाच घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असल्याने प्रत्येकाची प्रतिक्रियाही भिन्न झाली. म्हणजेच परिणामांची जबाबदारी घटनेवर नव्हे तर ती घटना अनुभवणाऱया व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांच्या उदाहरणातील पहिला विद्यार्थी ज्याने घटनेचे ‘महाभयंकरीकरण’ केले, ठळकपणे त्यातील नकारात्मक बाजूचाच विचार केला आणि नैराश्यातून आत्मघात केला. दुसरा मुलगा ज्याने जणू शिक्षण हा आपला प्रांत नाही असा समज करून घेत शिक्षण सोडून दिले आणि एखादे काम पाहिले. तिसरा मात्र खचून गेला नाही. त्याने असे का झाले या कारणांचा शोध घेतला आणि पुन्हा जोमाने अभ्यास करून यश मिळविले. यामध्ये पहिल्या विद्यार्थ्यासारखा दुसऱयाचा दृष्टिकोन टोकाचा अविवेकी नव्हता परंतु तो उद्दिष्टाने प्रेरीतही नव्हता त्यामुळे नापास होणे याचा चुकीचा अर्थ काढून स्वतः पुढे शिकू शकतो, काही करू शकतो याचा विचार न करता स्वतःच्या विकासाचा मार्ग बंद  केला. तिसऱया विद्यार्थ्याने मात्र विवेकपूर्ण आणि वास्तववादी विचार करत प्रयत्नपूर्वक आपले उद्दीष्ट गाठले. म्हणजे पहा हं.. घटना एकच होती, नापास होणे. परंतु त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विचारांची पद्धत यामुळे प्रतिक्रिया, परिणाम भिन्न भिन्न झाले.

विवेक याचा नेमका अर्थ इथे लक्षात घ्यायला हवा. विवेक म्हणजे योग्य अयोग्य, चांगले वाईट, चूक बरोबर म्हणजे काय ते कळणे, सारासार विचार करून निर्णय घेणे. केवळ भावनेच्या आहारी न जाता एखाद्या घटनेचा अनेक अंगांनी विचार करणे वा करता येणे.

अर्थात यासाठी भावभावना हाताळण्याचे कौशल्य शिकायला हवे. कारण हळव्या, भावनाप्रधान व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाकडे तटस्थपणे पाहणे, निर्णय घेणे अवघड जाते. अनेकदा समस्येचे आकलन नीटपणे होत नाही, कधी वस्तुस्थिती नाकारण्याकडे कल असतो तर काहीवेळा नैराश्य, उद्विग्नता इतरांच्या तुलनेत पटकन येते. अतिसंवेदनशील व्यक्तींना भावनिक गुंता दूर करून समस्येकडे वस्तुनि÷पणे पहायला शिकवावे
लागते.

एखाद्या घटनेसंदर्भात आपले स्वगतही महत्त्वपूर्ण ठरते. लहानपणी झालेल्या किंवा आपण करून घेतलेल्या समजुतींमागे अनेकदा फारशी वैचारिक बैठक नसते. पुढे जाऊन याच समजुती आपल्या दृष्टिकोनाचा भाग बनतात. त्यामुळेही अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी व्यक्तीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणावा लागतो.

एखाद्या घटनेच्या संदर्भात आपण जे स्वगत बोलतो त्याआधारे मनात भावना निर्माण होत असतात. घडून गेलेली घटना बदलणे तर शक्मय नसते मात्र तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. घटना घडल्यानंतरचे हे स्वगत इतके झटकन आणि सहजतेने बोलले जाते की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, परंतु स्वगताबाबत आपण सजग नसलो तर मात्र हे स्वगत माणसाची अस्वस्थता टिकवून ठेवण्याचे काम करते. मनात येणाऱया विघातक भावना या स्वगतामुळे निर्माण होतात. हे स्वगत मनात घोळत राहील तोपर्यंत आपण अस्वस्थ होत राहणार. स्वगत आणि विघातक भावना बराच काळ राहिल्या आणि त्याची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी वाढत गेले तर ते आपल्याला निष्क्रिय बनवतील आणि मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य धोक्मयात येईल. समजा एखाद्या समस्येचे मूळ जरी भूतकाळात असले तरी ती समस्या त्या परिस्थितीमुळे नव्हे तर व्यक्तीच्या अविवेकी स्वगतामुळे टिकून राहते. स्वगताचे तर्कशुद्ध विश्लेषण कसे करायचे, दृष्टिकोनात कसा बदल घडवून आणायचा, स्वभावात बदल कसा करायचा हे डॉ. अल्बर्ट एलिस यांनी घटना, विचार पद्धती, घटनेचा भावनिक परिणाम, स्वगताला आव्हान, उपचारांचा परिणाम अशा पंचसूत्रीत मांडले आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन मानसोपचारतज्ञ डॉ. एलिस यांनी विकसित केलेली विवेकनि÷ भावोपचार पद्धत अर्थात RET ( Rational Emotive Therapy) हे प्रभावी तंत्र आहे. जे आता REBT (Rational Emotive Behaviour Therapy) या नावाने ओळखले जाते. कारण या तंत्रामुळे विचार, भावनांसोबतच वर्तनामध्येही बदल होतात. समुपदेशकांमध्ये अतिशय प्रिय असणारे हे तंत्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आपला अनुवंश अर्थात हेरिडिटी आणि परिस्थिती आपल्या वागण्या-बोलण्यावर परिणाम करत असतात. अनुवंश बदलता येणे शक्मय नसले तरी वातावरणात, परिस्थितीत योग्य तिथे योग्य तितका बदल करून एखाद्याची मानसिकता बदलता येते परंतु त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत. दृष्टिकोनातील बदल बऱयाच गोष्टींमधे बदल घडवू शकतो. विवेकपूर्ण आणि वास्तववादी विचारांची कास धरून चालले तर बऱयाच गोष्टी सोप्या होतात. अर्थात या तंत्राविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.

ऍड. सुमेधा संजीव देसाई

Related Stories

वटवृक्षाचे महत्त्व आणि त्याचे औषधी गुण

Patil_p

कूटश्लोक

Patil_p

बडगा हवाच, पण…

Patil_p

मुक्त स्वानंदातच रमलेला असतो

Patil_p

भारतातील औषधी वनस्पती परंपरा

Patil_p

आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे की पूर्ण सरकारने!

Patil_p