इंडिगोच्या विमानात घडला प्रकार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
इंडिगोच्या विजयवाडा-हैदराबाद विमानसेवेत एका तेलगू भाषिक महिलेसोबत कथित स्वरुपात भेदभावाचा प्रकार घडला आहे. या महिलेला केवळ तेलगू भाषा बोलता येत होती, तिला हिंदी किंवा इंग्रजी भाषा येत नसल्याने दुसऱया सीटवर बसण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर यामुळे भाषेच्या आधारावरील भेदभावावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
आयआयएम अहमदाबादच्या सहाय्यक प्राध्यापिका देवस्मिता चक्रवर्ती यांनी ट्विट करत हा प्रकार मांडला आहे. एअरलाइन्सच्या स्टाफने सुरक्षेचे कारण देत एका तेलगू भाषिक महिलेला तिच्या सीटवरून उठविले आहे, केबिन क्रूकडून दिले जाणारे इंग्रजी किंवा हिंदीतील निर्देश ती समजू शकत नव्हती असे ट्विटमध्ये नमूद आहे.
ही महिला विजयवाडा येथून हैदराबाद येथे जात होती. विमानाचा दरवाजानजीक 2 ए या सीटवर ती बसली होती. चालक दलाने या महिलेला तेथून उठवत 3 सी सीटवर बसविले. 2 ए सीट इर्मजन्सी एक्झिटनजीक असल्याने कुठल्याही आपत्कालीन स्थितीत महिलेला इंग्रजी किंवा हिंदीत दिल्या जाणाऱया निर्देशांचे पालन करता येणे शक्य नव्हते. याचमुळे तिची सीट बदलण्यात आल्याचे समजते. 2 ए सीट अत्यंत महत्त्वपूर्ण असून तेथे बसणाऱया व्यक्तीला निर्देशांचे पालन करण्यास सक्षम असणे गरजेचे असल्याचे एअरलाइन्सच्या कर्मचाऱयांचे म्हणणे आहे.
विशेष मार्गांवरील विमानोड्डाणांमध्ये स्थानिक भाषा समजणाऱया कर्मचाऱयांना नियुक्त केले जावे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये अशी सूचना तेलंगणाचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामाराव यांनी ट्विट करत इंडिगो कंपनीला उद्देशून केली आहे.