पंजाब लोक काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण शक्य
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीप्रसंगी कॅप्टन यांचे पुत्र रणइंदर सिंह देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींसोबत पंजाबशी निगडित अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान राज्य अन् देशाच्या सुरक्षेसाठी मिळून काम करण्याचा विचार मांडला आहे. आम्हा दोघांसाठी सुरक्षा हाच प्रमुख विषय राहिला असून यापुढेही राहणार असल्याचे कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटले आहे.
तर कॅप्टन अमरिंदर यांच्या या भेटीला त्यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या चर्चेशी जोडून पाहिले जात आहे. भाजप पुढील लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील सर्व जागा स्वतःच्या चिन्हावर लढविण्याच्या तयारीत आहे.
कॅप्टन अमरिंदर हे अलीकडेच विदेशात उपचार करवून घेत मायदेशी परतले आहेत. कॅप्टन अमरिंदर यांनी आता स्वतःच्या राजकीय हालचालींना वेग दिला आहे. देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार असून अशा स्थितीत कॅप्टन यांची पंजाबमध्ये महत्त्वाची भूमिका असू शकते. भाजपमध्ये संघटनात्मक बदलाची चर्चा सुरू असताना कॅप्टन अमरिंदर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे.
कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून हटविले होते. यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करत भाजपसोबत आघाडी केली होती. परंतु त्यांच्या पक्षाला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या. तर कॅप्टन अमरिंदर हे स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या पतियाळा मतदारसंघात पराभूत झाले होते.