पक्षात सामील होणार असल्याची चर्चा : गुजरात निवडणुकीत दिसणार प्रभाव
वृत्तसंस्था / अहमदाबाद
नरेश पटेल यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. 57 वर्षीय उद्योगपती आणि समाजसेवक नरेश पटेल हे पाटीदार समुदायावर मोठा प्रभाव असणारे व्यक्ती आहेत. नरेश पटेल यांना स्वतःच्या पक्षात सामील करण्यासाठी काँग्रेस दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनीही त्यांची भेट घेत पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. भाजपने देखील नरेश पटेल यांना स्वतःच्या गोटात घेण्याचा प्रयत्न चालविला होता. गुजरातमध्ये नरेश पटेल यांचा मोठा प्रभाव असल्याने आम आदमी पक्षही या दृष्टीकोनातून प्रयत्न करत आहे.
नरेश पटेल यांना अलिकडेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत धार्मिक व्यासपीठांवर पाहिले गेले होते. आम आदमी पक्ष देखील त्यांना स्वतःसोबत घेण्याकरता प्रयत्नशील आहे. नरेश पटेल यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली होती. परंतु आता नरेश पटेल हे काँग्रेससोबत चर्चा करत नसल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे कयास व्यक्त होत आहेत.
1.5 कोटी पाटीदार लोकसंख्या
कमी बोलणारे म्हणून ओळखले जाणारे नरेश पटेल हे गुजरातमधील श्री खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. राजकोटनजीक कागवाडध्ये लेउवा पटेल समुदायाची ईष्ट देवी खोडियलच्या मंदिराचे व्यवस्थापन हा ट्रस्ट सांभाळतो. ट्रस्टमुळे पाटीदार समुदायात त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. गुजरातच्या 6 कोटी लोकसंख्येत सुमारे 1.5 कोटी लोकसंख्या असलेला हा समुदाय निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतो. नरेश पटेल एका कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. याचबरोबर त्यांनी सरदार पटेल कल्चरल फौंडेशन स्थापन केले असून ते शासकीय नोकरींसाठी इच्छुक तरुण-तरुणींना मोफत कोचिंग प्रदान करते. तसेच त्यांनी खोडलधाम समाधान पंचची स्थापना केली असून त्याद्वारे वाद सोडविण्यासाठी पर्यायी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
1820 पैकी 70 जागांवर प्रभाव
गुजरातच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका राहणाऱया पाटीदार समुदायाचे नरेश पटेल सदस्य आहेत. गुजरातमध्ये सुमारे 15 टक्के पाटीदार असून जवळपास प्रत्येक जिल्हय़ात त्यांचे लक्षणीय प्रमाण आहे. सौराष्ट्रात पाटीदारांची संख्या सर्वाधिक आहे. गुजरातच्या एकूण 182 विधानसभा मतदारसंघांपैकी 70 ठिकाणी पाटीदार समुदाय निकाल प्रभावित करू शकतो.
पाटीदार समुदाय अन् राजकारण
2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 48 टक्के मते मिळाली होती, यात पाटीदारांची हिस्सेदारी 11 टक्के होती. परंतु 2014 च्या निवडणुकीत पाटीदारांची 60 टक्के भाजपला मिळाली. तर 2017 च्या विधानसभ्घ निवडणुकीत भाजपला यातील 49.1 टक्के प्राप्त झाली. त्यावेळी भाजपला केवळ 99 तर काँग्रेसला 82 जागा मिळाल्या होत्या. 2012 च्या निवडणुकीत भाजपने 50 पाटीदारांना उमेदवारी दिली होती, यातील 36 जण विजयी झाले होते. तर 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 28 आणि काँग्रेसचे 20 पाटीदार उमेदवार निवडून आले होते. गुजरातमध्ये भाजपचे सध्या 44 आमदार, 6 खासदार आणि राज्यसभेचे 3 खासदार हे पाटीदार समुदायाचे आहेत.