Tarun Bharat

कुडचडे पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Advertisements

बेकायदा बांधकामे, कचरावाहू वाहने व कामगारांचे प्रश्न झाले उपस्थित : नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांचा बहिष्कार

प्रतिनिधी / कुडचडे

कुडचडे-काकोडा नगरपालिकेची गुरुवारी बोलविण्यात आलेली मासिक बैठक व्यवस्थित सोपस्कार पूर्ण न करता घेतल्याबद्दल नगरसेवक बाळकृष्ण होडारकर हे बैठकीवर बहिष्कार घालून निघून गेले. त्यानंतर क्रमाक्रमाने नगरसेवक उपस्थित झाल्यावर बैठकीची सुरुवात करण्यात आली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीस नगराध्यक्ष जस्मिन ब्रागांझा, उपनगराध्यक्षा रुचा वस्त, नगरसेवक सुशांत नाईक, दामोदर बेणे, योलोंदा पेरेरा, रिमा एलिस, प्रमोद नाईक, टोनी कुतिन्हो, प्रदीप नाईक, अपर्णा प्रभुदेसाई, क्लेमेंटिना फर्नांडिस, कार्मेलिना मोरायस, विश्वास सावंत, आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, मुख्याधिकारी मनोहर कारेकर, पालिका अभियंता दीपक देसाई यांची उपस्थिती होती. सदर बैठकीत पालिकेद्वारे स्वातंत्र्यदिनी करायचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले.

ज्या प्रकारे सांगण्यात आले आहे की, प्रत्येकाच्या घरात तिरंगा द्यावा व त्याचे मूल्य घेण्यात यावे हे व्यवस्थित नसून जे कोणी यासाठी इच्छुक आहेत व विकत घेण्यास तयार आहेत त्यांनाच तिरंगा द्यावा. अन्यथा प्रत्येक घराला पालिकेद्वारे मोफत तिरंगा द्यावा, असे मत नगरसेवक दामोदर बेणे यांनी हर घर तिरंगा या विषयावर प्रश्न मांडताना व्यक्त केले. त्यानंतर चर्चा करून तिरंगा घेण्यास इच्छुक असलेल्यांना तो रु. 25 या किमतीने द्यावा, असा निर्णय घेण्यात आला.

खामामळ जेटीचे सर्वेक्षण होणार : नगराध्यक्षा

नगरसेवक प्रदीप नाईक यांनी सांगितले की, एरव्ही पालिका परिसरात लहान भिंत किंवा दुकानाची दुरुस्ती करण्यासाठी अर्ज आला, तर पालिका सदर दुकानाच्या किंवा जागेच्या छायाचित्राची मागणी करते. पण हल्लीच खामामळ येथे दुरुस्तीकामाचे कारण सांगून नव्याने बांधण्यात आलेल्या जेटीला पालिकेकडून बांधकामाची परवानगी देण्यात आली होती का यासंबंधी उपस्थित पालिका अभियंत्यांना विचारावे, असे ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना नगराध्यक्षा ब्रागांझा यांनी त्याचे लवकरात लवकर सर्वेक्षण करण्यात येणार, असे सांगितले. त्याचबरोबर अशा प्रकारे पालिका परिसरात जी बेकायदेशीर दुकाने किंवा आस्थापने उभारण्यात व सुरू करण्यात आली आहेत ती उजेडात आणून त्यावर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.

कामगारांना पैसे देण्यास दिरंगाई का ?

सध्या पालिकेकडून कामगारांची भरपूर सतावणूक करण्यात येत असल्याचा दावा करून काम करणाऱया कामगारांना त्यांच्या मेहनतीचे पैसे देण्यास का दिरंगाई करण्यात येत आहे, असा प्रश्न सर्व सदस्यांनी केला. त्यावर, नगराध्यक्षा स्वतः लक्ष घालणार, असे उत्तर देण्यात आले. तसेच कामगारांची कमतरता, कचरा नेणाऱया गाडय़ांकडून उघडय़ा स्थितीत कचरा नेण्याचे प्रकार, पालिकेच्या नवीन इमारत परिसरात रात्रीच्या वेळी चाललेली अंदाधुंदी व मद्यपानाचे प्रकार याकडे ताबडतोब लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

कचरावाहू गाडय़ा पासिंग नसताना रस्त्यावर हाकण्यात येतात व चुकीने सदर वाहनाला अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण असणार, असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला. कचरावाहू गाडय़ांच्या देखभालीकडे बिल्कुल लक्ष देण्यात येत नाही. पालिकेने आपल्या कामगारांकडून अशा प्रकारची कामे करून घ्यावीत, असा प्रस्ताव मांडण्यात आला. सुरुवातीला बैठकीत कामकाजाची नोंद ठेवणारा रिकॉर्डर न आणल्याने सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेतला व पुढच्या बैठकीत तो हजर ठेवण्याची मागणी केली.

Related Stories

कामत यांच्या विरोधात लढण्यास घनश्याम शिरोडकर इच्छुक

Amit Kulkarni

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीयांसाठी हेल्पलाईन

Patil_p

‘एसटी’चे पहिले सभापती रमेश तवडकर

Amit Kulkarni

अमित शहा आज गोव्यात

Amit Kulkarni

फेसबुकद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला अटक

Patil_p

लसीकरण मोहिमेस आचारसंहितेचा फटका

Amit Kulkarni
error: Content is protected !!