मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील रस्ते चांगले आहेत. मात्र, गोव्यातून बेळगावला जोडणारे कर्नाटकमधील रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते शक्य तेवढय़ा लवकर दुरूस्त करण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री काल सोमवारी कार्यक्रमानिमित्त मडगावात आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री हल्लीच स्वतः चोर्लामार्गे बेळगावला गेले होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक कचरा आढळून आला. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ जारी करून निसर्गाशी अशा प्रकारे हानी न करण्याचे आवाहन सर्वांना केले होते. कचऱया संदर्भात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे मुख्यमंत्री त्यात म्हणाले होते. हा मुद्दा पकडून पत्रकारांनी त्यांचे लक्ष खराब रस्त्याकडे वेधले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याच्या बाजूचे रस्ते चांगले आहेत. मात्र, कर्नाटकाच्या बाजूने रस्ते खराब झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जेव्हा चोर्ला मार्गाचा ताबा जाईल, तेव्हाच तो चौपदरी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मडगावचे कबरस्तान तसेच अन्य समस्या सोडविल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. यंदाच्या हंगामात खनिज व्यवसाय सुरू व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.