सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
प्रतिनिधी/काणकोण
काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी काणकोण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या ‘व्हिजन काणकोण-2030’ या संकल्पनेसंदर्भात काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयात नुकत्याच बोलाविण्यात आलेल्या सरकारी खात्यांच्या प्रमुखांच्या बैठकीला चांगली उपस्थिती लाभली. एकूण 52 खात्यांमधील अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. तवडकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी आणि प्रतिनिधींशी काणकोणच्या विकासासंबंधी चर्चा केली आणि त्यांना बऱयापैकी प्रतिसाद मिळाला.
या बैठकीला कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत, काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, श्री मल्लिकार्जुन चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे सचिव मंजुनाथ देसाई, काणकोणचे साहाय्यक नगरनियोजक यजुवेंद्र रेडकर, उच्च शिक्षण विभागाच्या डॉ. प्रियांका वेळीप, आदिवासी कल्याण खात्याचे उपसंचालक सागर वेर्लेकर, मत्स्योद्योग खात्याचे उपसंचालक चंद्रकांत वेळीप, पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, सर्वेक्षण खात्याचे सुदेश भैरेली, क्षेत्रिय वनाधिकारी दामोदर सालेलकर, आयटीआयचे प्राचार्य सम्राट ना. गावकर तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हायवे, पाणीपुरवठा, इमारत विभागांचे आणि जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंते, काणकोणचे मामलेदार, आरोग्य, नागरी पुरवठा, वीज, क्रीडा आणि कृषी या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे संचालन सिद्धार्थ देसाई यांनी केले.