बेळगाव : बेळगाव शहराच्या रिंग रोडच्या विरोधात शेतकऱ्यांच्यावतीने सातत्याने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज (शनिवारी) थेट केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व रिंग रोड रद्द करण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज (शनिवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. याचे औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सकाळी कोल्हापूर येथे त्यांची भेट घेतली.
बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध शासकीय योजनांच्या नावाखाली संपादित केल्या जात आहेत. यामुळे बेळगाव सीमाभागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. निवेदनासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीने शेतकऱ्यांचा असलेला रिंग रोडला विरोध आणि रिंग रोडमुळे शेत जमिनीचे किती नुकसान होणार आहे, या संदर्भात माहिती देणारा जो व्हिडिओ बनवला आहे. त्याची सीडी गडकरी यांना दिली.
यावेळी निवेदन स्वीकार करून बोलताना मंत्री गडकरी यांनी आपण कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून बेळगाव रिंग रोडला होणारा विरोध व शेतपिकांचे होणारे नुकसान याबाबत थोडीफार माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी आपण सखोल माहिती घेऊन रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करू असे स्पष्ट केले. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या रिंग रोडमुळे तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागणार असल्यामुळे रिंग रोड रद्द करून त्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज उभारावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
रिंग रोडमुळे तालुक्यातील ३२ गावांमध्ये शेतकऱ्यांची सुमारे १३०० एकर सुपीक टिकाऊ जमीन नष्ट होणार असून या प्रकल्पासाठी हजारो कोटींचा खर्च येणार आहे. या तुलनेत जर फ्लाय ओव्हर ब्रिज उभारला तर फक्त २८ एकर जमीन जाणार असून या प्रकल्पासाठीचा खर्च देखील तुलनात्मक दृष्ट्या अत्यंत कमी म्हणजे जवळपास ५०० कोटीपर्यंत जाणार आहे. हा प्रस्ताव प्रथम दर्शनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पसंत पडला असून त्यांनी याबाबत जरूर विचार केला जाईल असं आश्वासन दिलं आहे.