Tarun Bharat

प्रच्छन्न रोजगार : काही निरिक्षणे

Advertisements

नोकरदारांच्यामध्ये, विशेषतः कमी पगाराच्या, जास्त जबाबदारीच्या, नियमित नोकरीखेरीज-आजूबाजूला मिळणारे काम करण्याची व अधिकचे उत्पन्न मिळविण्याची प्रवृत्ती दिसून येते. अशा नियमित कार्य बाह्य रोजगाराला आपण ‘प्रच्छन्न रोजगार’ (Moonlighting) असे म्हणू.  छुप्या बेरोजगारीप्रमाणे छुपा रोजगारही असतो. कायद्याच्या मर्यादेत विचार करता, कांही लोक याला ‘चोर रोजगार’ असेही नांव देवू शकतील.  काहींना असा रोजगार प्रतिष्ठेचा, संदर्भाचा वा आकांक्षा पूर्तीचा वाटतो. या प्रकारच्या रोजगाराचा प्रभाव माहिती तंत्रविज्ञान क्षेत्रात अधिक आढळतो.

एका मोठय़ा आयटी कंपनीच्या प्रमुखाने अशा प्रकारचा चोर रोजगार-ही शुध्द फसवणूक अशी भावना व्यक्त केली. या उलट कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या दि कॅपिटल ग्रंथाच्या खंड-1 मध्ये-श्रम ही वस्तू प्रमाणे विकणे-खरीदणे होते. तेंव्हा वेतनावर आधारित सामाजिक संबंधात मालक-कामगार नाते निर्माण होते.  कामगाराला श्रमाचे पर्याय बंद करण्यात एका अर्थाने ‘सक्तीचे श्रम’ निर्माण होतात.  प्रत्यक्षात कारखानदारीत ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेसाठी तेच ते काम करण्यासाठी वेतन दिले जाते. माहिती तंत्र क्षेत्रात वेतन कालबध्द प्रकल्पांवर आधारित असते. वेतनाचा संबंध उत्पादनाशी (Volumes) जोडला जात नाही, त्यात नियमित कामगारांपेक्षा प्रकल्प-संबंधित-अधिक उत्पन्नाच्या रोजगाराचे महत्त्व वाढते. अशा परिस्थितीत, कुशल कामगार, वेतनदार अनेकदा, कार्यस्थगन, रोजगार खंड, रोजगार कुंठितता अशा चक्रात अडकतो. परिणामी, त्यांना स्वावलंबनाशिवाय पर्याय राहत नाही.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेतन ठरताना, 30-45 टक्के वेतन विक्रीच्या बिलावर अवलंबून असते. साहजिकच वेतनदर कमी असतात. उत्पन्न मर्यादित राहते. याचाच परिणाम या क्षेत्रात अनेक कर्मचारी चोर-रोजगार करतात. कोविड-19 महामारीमुळे हा प्रकार अधिक वाढला. वेतन घट, कार्य स्थगिती, यामुळे रोजगार सुरक्षा कमी झाली. परिणामी, बहुतेक ज्येष्ठ कर्मचार्यांनी पूरक रोजगार-प्रच्छन्न रोजगार-चोर-रोजगार करणे आवश्यक मानले.

दुसऱया बाजूस ‘घरून काम’ पध्दतीची चिमट. यामुळे-एकाकी पडल्याची भावना.    त्यातून एक प्रकारची मानसिक कोंडी, ज्यांना तात्पुरते बसवले असते. त्यांचा कोंडमारा (बांधित श्रमशक्ती) सामुहिक जीवनाचा अभाव, कौशल्य सुधारणेचा अभाव यातून संल rकरणाची प्रवृत्ती वाढली व चोर-रोजगार हा व्यवस्थेचा कायमचा व महत्त्वाचा उघड घटक झाला.

नव्या ‘घरून काम’ व्यवस्थेत बऱयाच कर्मचाऱयांची कार्यक्षमता वाढली. पण त्याचबरोबर चोर-रोजगाराचे प्रमाणही वाढले. कांहीनी आपली स्वतःची नवी व्यवसाय संस्था उभी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळेचा वापर केला. या सर्वांचा परिणाम असा झाला की, चोर-रोजगार व घरून काम या गोष्टी आता नित्याच्या होत आहेत. एका अलीकडच्या अभ्यासाप्रमाणे 400 लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर असे आढळले की, 42 टक्के कर्मचारी घरून काम करण्यास मान्यता नसेल तर सेवामुक्त होण्याचा निर्णय घेतील.

चोर-रोजगाराची संभाव्यता वाढल्यामुळे अनेक माहिती तंत्र संस्था अस्वस्थ झाल्या आहेत. चोर-रोजगारामुळे कर्मचाऱयांना पर्याय उपलब्ध होतात. नियोक्त्यांचा प्रभाव कमी होतो. जमीन, भांडवल व श्रम या पारंपारिक उत्पादन घटकाऐवजी कौशल्य, मूल्य व उपलब्धता हे घटक अधिक महत्त्वाचे होतात. ज्या वातावरणात अनेक कामे स्वयंचलित होत आहेत व कांही मोजक्या लोकांवर व्यवसायाचे यश अवलंबून आहे, त्या व्यवस्थेत कर्मचारी व्यवसाय संस्थेचे सामर्थ्य घटक तसेच संस्थेसाठी धोका घटकही होतात.

एकूण परिस्थिती विचित्र झाली आहे.  स्वतःचे भांडवल असणारे कामगार आता आपल्या नियोक्त्यांशी स्वाभिमानाने वागू शकतात व कामाची परिस्थिती व वेतन ठरविण्यात त्यांचा प्रभाव पडू शकतो. या बदलामुळे बाजार कार्यक्षमतेच्या संकल्पनेत मोठा फरक पडू शकतो. स्वप्रमाणे कौशल्य पुरवठय़ाच्या शक्यतेमुळे लहान व्यवसाय संस्थाही मोठय़ा प्रकल्पासाठी स्पर्धा करू शकतील. पण या प्रक्रियेत ग्राहक/उपभोक्त्याला उत्तम मालाची हमी मिळेल.

चोर-रोजगारावर टीका करणे सोपे असले तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, नियोक्तेही अनेक प्रकारच्या चोऱया करतात. (वेतन दर, पैशाचा वापर, प्रकल्प, व्हिसा काढून कर्मचाऱयास परदेशी कामाला पाठविणे, बेंचिंग करणे व कायदेशीर कराराच्या दबावाखाली कामगारांना पिळणे). आता भविष्यासाठी मालक-कामगार नाते बदलले पाहिजे. अलीकडे चोर-रोजगार वाढताना दिसतो. तसेच त्याविरूध्द मालक वर्गाची ओरडही वाढत आहे. ज्या श्रम बाजारात मागणी पुरवठय़ापेक्षा जास्त आहे, त्या बाजारात आता कामाचे करार (श्रमिक/कर्मचारी करार) नव्या पध्दतीने लिहिण्याची गरज आहे. कामाकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलणे आवश्यक आहे.

चोर-रोजगार नवा नाही. तसाच तो अनोळखीही नाही. अनेक व्यवसायात चोर- रोजगार असतोच. टंकलेखक, लेखक, पत्रकार, फिल्म मेकर्स, शिकविण्या घेणारा शिक्षक ही सर्व चोर-रोजगाराचीच उदाहरणे आहेत. ज्या रोजगारात योग्य वेतन मिळत नाही. वेळेवर वेतन मिळत नाही. त्यातील कामगार चोर-रोजगार करण्याकडे वळणार-चार पैसे जास्त मिळविण्यासाठी!

भारताच्या माहिती-तंत्र क्षेत्रात बऱयापैकी वेतनदार आहेत. समाधानी मध्यम वर्ग तयार झाला आहे. त्यांना चोर-रोजगार करण्याची गरज जाणवत नाही. हे लक्षात घेवून अन्न वाटप कंपनी स्विगीने आपले कार्य धोरण बदलून कर्मचाऱयांनी चोर-रोजगार करण्याचे धोरण स्वीकारण्याचे जाहीर केले. तेंव्हा त्या उद्योगातच व माहिती तंत्र क्षेत्रात प्रचंड गदारोळ माजला. बहुतेक माहिती-तंत्र संस्थांनी चोर-रोजगार फसवणुकीचा प्रकार आहे असे जाहीर केले. त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, एका नियोक्त्याने दिलेल्या प्रशिक्षणाचा वापर कर्मचाऱयाने दुसऱया नियोक्त्यासाठी करणे यात खरा घोटाळा, प्रश्न निर्माण होतो.

बराच काळ उद्योग/व्यवसाय संस्था कर्मचाऱयांना आपल्या मालकीच्या वस्तू मानत, त्यासाठी वेतन व पूरक सोई या स्वरूपात किंमत दिली जायची.  खरेतर व्यवसाय ठराविक वेळेच्या श्रमसाठी किंमत देतात. करारातील सेवांची किंमत असते ती! पण त्यासाठी उत्पादनाची उद्दिष्टय़े (बहुधा अतिरिक्त) करारात दिलेली असतात.  बदलत्या तंत्र विज्ञानाच्या वातावरणात प्रशिक्षण हा कायमचा घटक आहे व तो दोन मार्गी असतो. त्याचा फायदा कर्मचाऱयास तसाच उत्पादकांसही होतो.  विशेष म्हणजे या प्रक्रियेत ग्राहकांच्या बदलत्या गरजाही लक्षात घेतल्या जातात.

व्यवसाय संस्थांनी आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी करार कलमे टाकावीत. पण त्या पलीकडे कर्मचाऱयांनी जादा उत्पन्नासाठी इतरत्र-इतर प्रकारचे काम करणे अनैतिक, अयोग्य आहे, असे म्हणणे व्यावहारिक नाही, शहाणपणाचे नाही.

प्रच्छन्न रोजगार नेहमीच जादा उत्पन्नासाठीच असतो असे नाही. अयोग्य/ विसंगत काम, कामाचे अकारण तास, हुजरेगिरी हे टाळण्यासाठी चोर-रोजगार केला जातो. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा हेही चोर-रोजगाराचे कारण असू शकते.

प्रत्यक्ष व्यवहारात कामाच्या तासाखेरीज कर्मचारी काम करतात का? हे तपासणे अत्यंत अवघड आहे. कोणत्या प्रकारचा चोर-रोजगार अनैतिक आहे, हे ठरविणेही कठिण आहे. सल्ला देणे हा तसा प्रकार होतो का?

कांहीच्या मते, खंड पध्दतीने विपणन, कँटिन पुरवठा, वाहतूक, कंत्राटे, देणी भागविणे हे प्रकार खरे तर पैशासाठी केलेल्या चोर-रोजगारापेक्षा अधिक अनैतिक आहेत. म्हणूनच नोकरीच्या बाहेर कर्मचाऱयांनी काय करावे हे नियोक्त्याने ठरवू नये.

ज्या माहिती तंत्र व्यवसाय संस्था कर्मचाऱयांच्या वाढत्या उत्पादकतेला जादा मेहेनताना देतात. त्या एक प्रकारे प्रच्छन्न रोजगार मान्य करतात. असा अर्थ घ्यावा लागेल. संख्यात्मक वा गुणात्मक निकषावर काम समाधानकारक असल्यास कर्मचारी आपल्या मोकळ्या वेळेचा वापर कसा करतो हे नियोक्त्याने बघण्याचे कारण नाही.

खरेतर व्यवसाय संस्थांनी आपले व्यवहार अधिक खुले, पारदर्शी करण्याची गरज आहे. काही ठिकाणी नवनियुक्त कर्मचारी ठरलेल्या कामासाठी हजर राहत नाहीत.  कामगार व नियोक्ता यात आवश्यक विश्वास नसेल तर उत्पादतेवर प्रतिकूल परिणाम होतो. बांधिलकी कमी होते. कोणत्याही उद्योग/ व्यवसाय संस्थेस मूल्य वर्धन करण्यासाठी कामाच्या तासाबरोबर विश्वास व बांधिलकी यांचीही गरज असते.

भारतीय तंत्र विज्ञान संस्था भविष्याची दारे/ मार्ग ठरवितात असे समजले जाते.  ही भूमिका टिकवायची असेल तर कर्मचाऱयांमध्ये बांधिलकीची भावना वाढविणे आवश्यक आहे. मालक ही केंव्हाही बदलण्याची बाब ठरू नये.         

प्रा.डॉ. जे.एफ. पाटील

Related Stories

बाविसावा गुरु अनाकलनीय वागणारा सर्प

Patil_p

भावनेला येऊ दे गा; शास्त्र काटय़ाची कसोटी

Patil_p

‘ऑपरेशन लोटस’

Omkar B

ताण-तणावाचा सामना करताना….

Patil_p

सत्वगुणाची वाढ करून रज आणि तम गुण नाहीसे करता येतात

Patil_p

तिसऱया लाटेची भीती ?

Patil_p
error: Content is protected !!