मराठा महासंघाची मागणी; मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचे पडसाद
कोल्हापूर प्रतिनिधी
जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सेवा बजावत असताना मराठा समाजाबद्दल अतिशय हिन बेताल वक्तव्य केले आहे. त्याचे मराठा समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा प्रकार निषेधार्ह असून त्यांना बडतर्फ करुन कायमचे कार्यमुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे गुरुवारी मराठा महासंघातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक व जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार संतोष कणसे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आई बहिणींचा मोठा सन्मान आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस खात्याबद्दलही जनतेत आदराची भावना असून विश्वासही आहे. सेवा बजाविण्यापूर्वी जात, पात, धर्म न पहाता काम करण्याची शपथ घेवूनही मराठा समाजाविषयी व्देषभावनेतून पोलिस निरीक्षक बकाले यांनी वक्तव्य केले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होत आहे तरी समस्त मराठा समाजाच्या तीव्र भावना संबंधित पोलीस अधीक्षकांना कळवून संबंधित पोलीस निरीक्षकाला फक्त बडतर्फ न करता कायमचे कार्यमुक्त करावे. अन्यथा रस्त्यावरील लढाई सुरु करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील.
शिष्टमंडळात ऍड. गुलाबराव घोरपडे, महादेव पाटील, सर्जेराव चव्हाण, राजू परांडेकर, प्रतीक साळुंखे, मनोज नरके, मिलिंद पाटील, मनोज पवार, संभाजी पाटील, धनवंत डाफळे, दत्तात्रय पाटील, शैलजा भोसले, अवधुत पाटील संयोगीता देसाई, विजय पाटील आदींचा समावेश होता.