सर्वाधिक महसूल भरूनही सोयी-सुविधांचा अभाव
बेळगाव : शहरात सर्वाधिक महसूल जमा करणाऱ्या उद्यमबागमध्येच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी चकाचक रस्ते करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी खड्ड्यांमधूनच मालाची वाहतूक करावी लागते. वेळच्या वेळी कर भरूनदेखील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची ही अवस्था का?असा प्रश्न उद्योजक व नागरिकांमधून विचारण्यात येत आहे. पहिल्याच पावसाने उद्यमबागमधील रस्त्यांची दुर्दशा केली आहे. मागील वर्षभरात काही ठिकाणी काँक्रिटचे रोड करण्यात आले खरे, परंतु भरमसाट उंची वाढविल्याने सखल भागातील कारखान्यांमध्ये पाणी शिरत आहे. काही ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून रस्तेच केले नसल्याने मोठमोठे खड्डे पडले असून कामगारांना ये जा करताना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
बेळगाव शहरात सर्वाधिक महसूल हा उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतूनच जमा होतो. बेळगावची प्रमुख औद्योगिक वसाहत म्हणून उद्यमबाग व अनगोळ औद्योगिक वसाहतीकडे पाहिले जाते. 3 ते 4 हजार लघु व मध्यम उद्योग येथे कार्यरत आहेत. परंतु, त्या मानाने औद्योगिक वसाहतीत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मागील अनेक वर्षांपासून रस्तेच करण्यात आले नसल्याने मातीच्या रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. कारखान्यांमध्ये इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येत असतो. सोळा चाकी मोठ्या लॉरी कच्चा माल घेऊन उद्यमबागमध्ये येतात. परंतु, रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये या लॉरी अडकल्या जात आहेत. काही वेळा उद्योजकांना लहान वाहनांनी हे सामान कारखान्यांपर्यंत न्यावे लागत आहे. त्यामुळे उद्यमबागमधील रस्त्यांची समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.