Tarun Bharat

त्या आमदारांविरुद्ध लवकरच अपात्रता याचिका

Advertisements

गिरीश चोडणकर यांनी केले सूतोवाच : आमदारांबरोबर पक्षसदस्य न गेल्याचा दावा

विशेष प्रतिनिधी / पणजी

काँग्रेस पक्षातून थेट भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांवर आता लवकरच अपात्रतेची तलवार टांगली जाणार आहे. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी या अगोदरच सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसची बाजू मांडणाऱया एका याचिकेसाठी गोव्यातील ताज्या घडामोडी प्रकरणी सभापतीनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भातील आदेशाची प्रत व इतर आवश्यक माहिती पाठविली आहे. गरज पडली व कोणीही याचिका सादर करणार नसतील तर आपण स्वतः सभापतींसमोर आठही आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका सादर करण्याचे सुतोवाच केले आहे.

गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, ताज्या घडामोडीत मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस व डिलायला लोबो अशा एकूण आठ आमदारांनी गेल्या आठवडय़ात पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता वा पक्षातील पदाधिकाऱयांबरोबर दोन तृतीयांश गट स्थापन करून भारतीय जनता पार्टीमध्ये विसर्जित केलेला नाही. केवळ 8 आमदार हे पक्षातून दोन तृतियांश अशी विधिमंडळ फूट दाखवून ती थेट भाजपमध्ये विसर्जित केलेली आहे.

आमदारांबरोबर कोणीही भाजपात गेले नाहीत

हे करताना या आमदारांनी 2019 मधील काँग्रेसच्या बाबू कवळेकर विरोधी पक्षनेता यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांच्या गटाचे थेट भाजपमध्ये झालेले विलीनीकरण, त्यानंतर तत्कालीन सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेला निवाडा आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला दिलेली मान्यता हे गृहित धरूनच ही मंडळी दोन तृतियांश हा कायदा झाला असे समजून त्याआधारे थेट भाजपमध्ये पोहोचली आहे. त्यांच्यासमवेत कोणीही पक्षात प्रवेश केलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयात याचिका

पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 2019 मधील फुटीबाबत उच्च न्यायालयाच्या निवाडय़ास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठाकडे ही याचिका गेलेली आहे. केवळ विधिमंडळ गटात झालेली फूट वा झालेले विभाजन ग्राहय़ ठरते? की पक्षामधली फूट ही ग्राहय़ धरली जाऊ शकते? असे सवाल केलेले असून या याचिकेवर आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयाने पक्षामध्ये विभाजन व दोन तृतियांश पक्षाचे दुसऱया पक्षात विसर्जन करता येते असे जर नमूद केले तर अगोदरचे 10 ही नेते अपात्र तर ठरतातच, शिवाय आता जे 8 जण भाजपमध्ये गेले ते देखील क्षणात अपात्र ठरतील.

सभापतींच्या आदेशाची प्रत सर्वोच्च न्यायालयात

दि. 14 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार थेट भाजपमध्ये गेले. त्याच रात्री सभापती रमेश तवडकर यांनी 8 ही आमदारांचे भाजपमध्ये जाण्याच्या प्रक्रियेला अधिकृत मान्यता दिली आणि विधानसभेत त्यांची आसन व्यवस्था देखील वेगळी दाखविली. सभापतींच्या या आदेशाची प्रत काँग्रेसनेते गिरीश चोडणकर यांनी इतर काही महत्त्वाच्या कायद्यासह सर्व महत्त्वाचे पुरावे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठविले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 2019 मधील आमदारांचे थेट भाजपमध्ये विलीनीकरण संदर्भात दिलेल्या निवाडय़ाने लोकशाही अडचणीत येते ही सबब लावून सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका सादर केली, त्यावर या अगोदर प्रख्यात वकील कपिल सिब्बल हे काँग्रेसची भूमिका मांडीत होते. आता माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे स्वतः सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसची बाजू मांडीत आहेत. गिरीश चोडणकर म्हणाले की, लवकरच आपण सभापतींसमोर 8 ही जणांना अपात्र करण्यासाठी याचिका सादर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा फेटाळला तर सभापतींसमोर सुनावणी होण्यापूर्वीच हे 8 आमदार अपात्र ठरतील, असे सांगितले.

Related Stories

आला श्रावण… आला मनभावन!

tarunbharat

कुडचडेत भाजपच्या नीलेश काब्राल यांची सरशी

Amit Kulkarni

आमदार प्रसाद गावकरांच्या बंधूचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश

Amit Kulkarni

विनायक आकारकर यांनी दिले कुत्राला जिवनदान

Amit Kulkarni

वाडे वास्कोतील तळय़ात वाढते प्रदुषण

Patil_p

स्वातंत्र्यसेनानी शिवानंद गायतोंडे यांचे पुण्यात निधन

Omkar B
error: Content is protected !!