वाहन चालकांसाठी ठरतेय डोकेदुखी : अपघात होण्याची शक्यता
वार्ताहर / पणजी
पणजी शहरातून पोलीस स्थानकमार्गे येणाऱया वाहनांसाठी मिलिटरी कॅम्पजवळील मधला रस्ता बंद केला आहे. त्यामुळे पणजी बाहेर जाणाऱया वाहनांना बांदोडकर मार्गावरून आयनॉक्स परिसरातील रस्त्याला वळसा घेऊन यावे लागत आहे. हा बदल वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत असून संपूर्ण वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
याअगोदर पणजी-पाटो येथील दिवजा सर्कलजवळ वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविली होती. त्यामुळे या भागात चक्काजाम होण्याचे प्रकार झाले होते. त्यावेळी ‘दै. तरुण भारत’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलीस खात्याला सदर सिग्नल यंत्रणा बंद करावी लागली होती. आता पुन्हा वाहतूक पोलिसांनी मिलिटरी कॅम्पजवळचा मधला रस्ता बंद केल्यामुळे वाहन चालकांसमोर नव्याने समस्या निर्माण झाली आहे.
पणजी शहरातील वेगवेगळय़ा रस्त्यांवरील वाहने पणजी पोलीस स्थानकमार्गे येऊन मधल्या रस्त्याने मांडवी किनारा रस्त्यावरून मांडवी पुलाखालून पणजी शहरातून बाहेर पडत होती, त्या वाहन चालकांना आता, बांदोडकर मार्गावरून पुढे आयनॉक्स समोरील रस्त्याजवळ वळसा घेत मांडवी किनारा रस्त्यावरून पणजी शहराबाहेर पडावे लागणार आहे. वाहतूक पोलीस अधिकाऱयांनी सदर रस्ता बंद करण्यापूर्वी पुढे उद्भवणाऱया समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक होते. आता सदर मधला रस्ता बंद केल्यामुळे पणजीहून मिरामारमार्गे जाणारी वाहने आणि पणजी पोलीस स्थानक मार्गावरून येणाऱया वाहनांसाठी समस्या निर्माण झाली आहे. याठिकाणी दोन्ही बाजूने येणारी वाहने एकमेकांच्या समोर येऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यावेळी मिरामारमार्गे जाणाऱया वाहनांना थांबा घ्यावा लागणार आहे किंवा पोलीस स्थानक मार्गावरून येणाऱया वाहनांना थांबा घ्यावा लागेल. त्यामुळे या मार्गावर दुतर्फा वाहतुकीची समस्या निर्माण होईल.
पणजी शहरातून बाहेर पडणाऱया वाहनांना पुढे ‘आंचिम’च्या मुख्य कार्यालयानजीकच्या वळणावरून वाहने बाहेर रस्त्यावर येईपर्यंत डोकेदुखी होणार आहे. यावेळी पणजीबाहेर जाणारी वाहने वळण घेईपर्यंत बांदोडकर मार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे.
अपघात होण्याची शक्यता
रस्ता अरुंद असल्यामुळे आंचिम परिसरातील वळणावर बस तसेच इतर अवजड वाहने वळवताना कसरत करावी लागणार आहे. यावेळी सतर्क राहावे लागणार आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्यावेळी तर ही समस्या आणखी गंभीर बनणार आहे. अशी जीवघेणी समस्या निर्माण होण्यापूर्वीच वाहतूक खात्याने मिलिटरी कॅम्पजवळील मधला रस्ता मोकळा करून वाहतूक समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.