प्रतिनिधी/ बेळगाव
परिवहनकडून बसपास वितरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी अशोकनगर येथील बेळगाव वन कार्यालयात पहिल्या बसपासचे वितरण डीटीओ के. के. लमाणी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बसपासची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताच बसपास उपलब्ध करून दिला जात आहे.
हनुमाननगर (टी.व्ही.सेंटर), गोवावेस आणि अशोकनगर येथील बेळगाव वन कार्यालयात बसपास वितरणाचे काम सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास वितरणाचे काम सुरू होते. यंदादेखील शैक्षणिक वर्षाबरोबरच बसपास वितरणाला सुरुवात झाली आहे. पहिलीपासून ते पदव्युत्तरपर्यंतचे सर्व बसपास उपलब्ध करून दिले जात आहेत. शक्ती योजनेमुळे मुलींचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थीच बसपास घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे एकूण बसपास मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटणार आहे.
बेळगाव विभागात दरवर्षी 76 हजारांहून अधिक विद्यार्थी बसपास घेत होते. त्यामुळे बसपासच्या माध्यमातून उत्पन्न मिळत होते. मात्र, गतवर्षीपासून बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. बसपास प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यासाठी बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वनमध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. शाळा शुल्क पावती, आधारकार्ड आदी कागदपत्रांसह अर्ज करू शकतो.
तीन ठिकाणी बसपास वितरणाचे काम
शहरातील हनुमाननगर, गोवावेस आणि अशोकनगर या ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयात बसपास वितरणाचे काम सुरू आहे. कोणत्याही बेळगाव वन कार्यालयात अर्ज केला तरी बसपास मिळविण्यासाठी हनुमाननगर, गोवावेस आणि अशोकनगर या ठिकाणीच पास वितरण होणार आहे.