येळ्ळूर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मदत : उपक्रमाचे कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरसारख्या ग्रामीण भागातील गरीब गरजू मुलींसाठी केलेली शैक्षणिक मदत अत्यंत मोलाची होती. त्याची दखल जायंट्स सखीने घेऊन मराठी मॉडेल स्कूल शाळेमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. आजही असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांना दरवषी नवीन पुस्तके, वह्या, दप्तर क्वचितच मिळत असतील. अशा विद्यार्थांना त्यांनी मदत केल्याने येळ्ळूर परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सरनोबत तर व्यासपीठावर अध्यक्ष सतीश पाटील, मुख्याध्यापक आर. एम. चलवादी, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष उत्तम खेमलाकर, माजी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन सदस्या नम्रता महागावकर उपस्थित होत्या. प्रास्ताविक आणि स्वागत करताना ज्योती अनगोळकर यांनी सखीच्या वाटचालीबरोबरच कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा अपर्णा पाटील, सचिव सुलक्षणा शिनोळकर, वृषाली मोरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शाळेचे दप्तर, एक डझन वह्या, कंपास बॉक्स, एक डझन पेन आणि पेन्सिल बॉक्स, परीक्षा पॅड असे साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे उत्तम खेमलाकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि नाटक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अध्यक्षीय समारोप करताना विद्या सरनोबत यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ब्रीदवाक्मयानुसार आपण दरवषी मुलींच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लावत असल्याचे सांगून येळ्ळूरच्या मॉडेल शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. सूत्रसंचालन सुलक्षणा शिनोळकर यांनी केले.