आयुर्वेदिक संशोधक आचार्य बाळकृष्ण महाराजांचे आगमन
योगगुरू रामदेवबाबा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ पणजी
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. च्या प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील ‘लोकमान्य मातृभूभी पुरस्कार 2023’ चे वितरण आज रविवारी पणजीतील आझाद मैदानावर भव्य कार्यक्रमात होणार आहे. हा पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे ते पतंजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुर्वेदिक संशोधक आचार्य बाळकृष्ण महाराज यांचे काल शनिवारी गोव्यात आगमन झाले.
आझाद मैदान, पणजी येथील या भव्य सोहळ्याची सारी तयारी पूर्ण झाली आहे. रामदेवबाबांचे सायंकाळी 4.30 वा. च्या दरम्यान कार्यक्रमस्थळी आगमन होईल. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज आणि आचार्य बाळकृष्ण हे एकाच वेळी तिथे येतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे यावेळी उपस्थित राहाणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आचार्य बाळकृष्ण यांना हा रू. 10 लाखांचा मातृभूमी पुरस्कार तसेच सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र बहाल करण्यात येईल. रामदेवबाबा व इतरांचे स्वागत आझाद मैदानाच्या बाहेर गोव्यातील पारंपरिक लोककलांच्या पथकाबरोबर मिरवणुकीने होईल. लोकमान्यचे चेअरमन आणि दै. ‘तरूण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर हे या सर्वांचे स्वागत करतील.
हा कार्यक्रम सायं. 5 वा. होणार असला तरी तत्पूर्वी सायं. 4.15 वा. गोव्यातील प्रख्यात कलाकार सदानंद आमोणकर (सतार) आणि मयंक बेडेकर (तबला) यांची जुगलबंदी होणार आहे. त्यानंतर गोवा संगीत महाविद्यालयातर्फे नामवंत बासरीवादक सोनिक वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखालील संगीत आणि वादक यांनी बसविलेले राष्ट्रभक्तीपर स्वागतगीत सादर करतील.
या कार्यक्रमास गोव्यातील तमाम मंडळींनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले आहे.