अंगणवाडय़ांचे संपूर्ण कामकाज बंद; महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिह्यातील अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अंगणवाडय़ांचे सर्व कामकाज बंद ठेवून पोषण ट्रकर भरला जाणार नसून अहवाल आणि माहिती दिली जाणार नाही. या कालावधीत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने केला आहे.
कृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱयांचे मानधन 5 वर्षांपूर्वी वाढवले. तर केंद्र सरकारने साडेचार वर्षांपूर्वी मानधनात वाढ केली होती. सध्या महागाई दुप्पटीने वाढली आहे. पण मानधनात वाढ नाही. अंगणवाडय़ांच्या भाडय़ात वाढ नाही. आहाराच्या दरात वाढ नाही. सेवा समाप्ती लाभ नाही. आजारपणाच्या रजा नाहीत. हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा देखील मिळत नाही. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱया सरकारने जुना मोबाईल भंगारात देण्याच्या पात्रतेचा होऊन देखील नवीन मोबाईल दिलेला नाही. इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रकर ऍप कर्मचाऱयांवर लादला. आपल्या खाजगी मोबाईलवरून, जमत नसेल तर इतरांना वेठीला धरून तो भरायला भाग पाडले. उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून कर्मचाऱयांचा छळ केला. धमक्या दिल्या. मागण्यांच्या पुर्ततेसाठी तारीख पे तारीख, दिली जात आहे. आता कर्मचाऱयांची सहनशक्ती संपली असून त्यांनी रणशिंग फुंकले असल्याचे पत्रकात नमूद आहे.
आंदोलनाचे स्वरूप
-1 फेब्रुवारीला राज्य शासन आणि प्रशासनाला आपली नोटीस बजावली जाईल.
-त्यानंतर सर्व जिल्हा परिषदा आणि प्रकल्प कार्यालयांना मोर्चा काढून नोटीस
–20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू होईल.
— प्रकल्प, जिल्हा, राज्य स्तरावर सातत्याने आंदोलने केली जातील.