300 खेळाडूंचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
संत मीरा स्कूल आयोजित कर्नाटक विद्याभारती यांच्या मान्यतेनुसार जिल्हास्तरीय विद्याभारती क्रीडा स्पर्धांना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंग प्रमुख पाहुणे म्हणून विमल फौंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे लक्ष्मण पवार, परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऍडव्होकेट चेतन मनेरिकर, अर्जुन अवॉर्ड विजेते मुकुंद किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती, ओंकार, भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संत मीराचे राष्ट्रीय खेळाडू अथर्व देमजी, अभिजित सर्वेश, देवेश माडकर, प्रियांका पाटील, सान्वी पाटील, सिद्दी लाटूकर, साई बसरीकट्टी या खेळाडूंनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. स्वरा अंजनकरने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत शांतीनिकेतन खानापूर, स्वामी विवेकानंद खानापूर, देवेंद जिनगौडा शिंदोळी, संत मीरा बेळगाव या शाळेच्या 300 खेळाडुंनी भाग घेतला होता. यावेळी शंकर कोलकार, निरज सावंत, धनसिंग धनाजी, बापू देसाई, ओंकार गावडे, मंजुळा तळवार, भाग्यश्री, सी. आर. पाटील., यश पाटील आदी उपस्थित होते.