कुडची, कुलगोड येथे दोघांना अटक
बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा पोलिसांनी गांजा विरुद्ध मोहीम उघडली आहे. कुडची (ता. रायबाग) व कुलगोड पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून 2 किलोहून अधिक गांजासाठा जप्त केला आहे. कुडचीहून सुटट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक माळप्पा पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून सादीक नवीलाल मेवेगार (वय 43, रा. कुडची) याला अटक केली. त्याच्याजवळून 22 हजार 500 रुपये किमतीचा 1 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
सादीकवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. दुसरी कारवाई कौजलगी येथे करण्यात आली. यमनाप्पा उद्दाप्पा मेत्री (वय 60, रा. कौजलगी) या वृद्धाला अटक करून त्याच्याजवळून 880 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. कुलगोडचे पोलीस उपनिरीक्षक जी. एस. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून यमनाप्पाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.