ऍक्शनदृश्याच्या शूटिंगदरम्यान घडला प्रकार


अभिनेत्री आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार ही चित्रिकरणादरम्यान जखमी झाली आहे. दिव्या लंडनमध्ये स्वतःच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. दिव्याने ‘सत्यमेव जयते 2’, ‘रॉय’ आणि ‘यारियां’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिव्याने स्वतःला झालेली जखम दर्शविणारे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. सेटवर शूटिंगदरम्यान लोखंडी सळीला धडकल्याने जखमी झाल्याचे तिने सांगितले आहे. आगामी चित्रपटाच्या ऍक्शन दृश्यादरम्यान जखमी झाले आहे. परंतु काम थांबवणार नाही. चाहत्यांच्या प्रार्थनेची आणि सकारात्मक ऊर्जेची गरज असल्याचे तिने म्हटले आहे. दिव्याच्या पोस्टनंतर अभिनेता पुलकित सम्राटने गेट वेल सून अशी कॉमेंट केली आहे. दिव्या लवकरच यारियां या चित्रपटाचा सीक्वेल ‘यारियां 2’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मीजान जाफरी, पर्ल व्ही. पूरी, यश दासगुप्ता, अनस्वारा रंजन, वरीना हुसैन आणि प्रिया वार्रिएर दिसून येणार आहे. ‘यारियां 2’ हा पर्लसोबतचा तिचा दुसरा प्रोजेक्ट ठरणार आहे. यापूर्वी पर्ल आणि दिव्याने 2020 मध्ये प्रदर्शित ‘तेरी आंखो में’मध्ये एकत्र काम केले होते.