पणजीत पर्पल महोत्सवाचे शानदार उद्घाटन : गोव्याने देशभरातील दिव्यांगांना आणले एकत्र
प्रतिनिधी /पणजी
पर्पल उत्सवाला काल शुक्रवारी सुरवात करताना दिव्यांग बांधवांनी साहसी खेळ, कला, संस्कृती, गोव्याचे धालो नृत्य, कुणबी हे सादर करून गोमंतकीयांची मने जिंकत पर्पल उत्सवात रंगत वाढवली.
गोवा राज्य दिव्यांग आयुक्त, समाज कल्याण खाते आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पर्पल उत्सवाला आयनॉक्स कोर्ट यार्ड येथे शानदार उद्घाटनाने आजपासून सुरवात झाली. उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार उल्हास तुयेकर, आमदार जीत आरोलकर समाज कल्याण खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, समाज कल्याण खात्याच्या संचालक संध्या कामत, दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाझिक उपस्थित होते.
देशभरातील दिव्यांगाना आणले एकत्र
केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, गोवा सरकारच्या माध्यमातून या पर्पल फेस्तने देशभरातील दिव्यांग लोकांना एकत्र आणले आहे. केंद्रीय मंत्रालय कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण सुविधा इत्यादीद्वारे दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी योग्य पावले उचलत आहे.
गोव्यात दिव्यांगांना आर्थिक मदत
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, शारीरिकदृष्टय़ा 80 टक्के दिव्यांग असलेल्या बांधवांना गोवा सरकार हे देशात सर्वाधिक पेन्शन देणारे राज्य आहे. गोवा सरकारतर्फे दिव्यांग बांधवांना पेन्शन म्हणून प्रति महिना 3500 रुपये दिले जाते. इतर दिव्यांग बांधवांनाही दरमहा 2500 दिले जातात. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वाधिक आरक्षण कोटा आहे.
पणजी पर्पल फेस्तासाठी अनुकूल शहर
पणजी शहर हे पर्पल फेस्तासाठी अनुकूल शहर असल्याचे दिव्यांग बांधवांनी सादर केलेल्या विविध कलांतून स्पष्ट होते. सर्व सार्वजनिक इमारतीतही दिव्यांग बांधवांना प्रवेश करण्यासाठी सोय करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
करमळी, जुने गोवे, पर्वरी, पणजीतील ईएसजी, कांपाल ग्राऊंड ईएसजी परिसर, आर्ट गॅलरी ईएसजी, आयनॉक्स पार्किंग परिसर, मिरामार किनारा, आयनॉक्स स्कीन 1, सांता मोनिका जेटी आदी ठिकाणी आज दिवसभर पर्पल फेस्तचे कार्यक्रम घेण्यात आले.
गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) सर्व परिसरात दिव्यांग बांधवांसाठी उपयोगी असणाऱया विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे स्टॉल थाटण्यात आले आहेत.
दरवर्षी होणार पर्पल फेस्त
गेले काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात खेळ, स्पर्धा, नृत्य व इतर कलाविष्कार दिव्यांग बांधवांनी यशस्वीपणे सादर केले असल्याने हा पर्पल उत्सव यापुढे राज्यात दरवर्षी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली. देशात पहिल्यांदाच गोव्यात हा फेस्त साजरा होत असल्याने गोव्याचे नाव देशपातळीवर झळकले असल्याचेही ते म्हणाले.