ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील गोर गरिबांची दिवाळी (Diwali) गोड करण्यासाठी राज्य सरकार १०० रुपयात आनंदाचा शिधा देत आहे. राज्यभरात त्याचे वाटप सुरु आहे. यातच १०० रुपयात देण्यात येणारा आनंदाचा ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी रविवारी दिली. सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील (Maharashtra) प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून (२३ ऑक्टोबर) ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या 4 ऑक्टोबरच्या बैठकीत शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल 100 रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवाळीच्या या शिध्याचे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून सुरु असलेली ही व्यवस्था संथ असल्यामुळे शिधा वाटपात विलंब झाला होता. यावरून सरकारवर टीका सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शिधा ऑफलाईन देण्याचा निर्णय आज चव्हाण यांनी घोषित केला.