सोमवारी विविध ठिकाणी लक्ष्मीपूजन : सामूहिक आरतीचे कार्यक्रम
वार्ताहर /किणये
आनंदाची पर्वणी ठरणाऱया दिवाळी सणाला तालुक्यात मोठय़ा उत्साहात व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. सोमवारी गावागावांमध्ये सामूहिक आरतीचे कार्यक्रम झाले. तसेच भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन करण्यात आले.
ग्रामीण भागात दिवाळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षीही ही परंपरा जोपासण्यात आली आहे. तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वसुबारसच्या पूजनाने दिवाळी सणाच्या पर्वाला सुरुवात करण्यात आली. दिवाळी सणाला वरुणराजाने कृपा दाखवल्याने दिवाळीचा सण सर्वत्र मोठय़ा चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी गावागावांमध्ये सामूहिक आरती कार्यक्रम झाले. आपापल्या कुळ घराच्या ठिकाणी नागरिक एकत्र जमा होताना दिसत होते. त्या ठिकाणी सामूहिक आरती करण्यात आल्या. पहाटे सोनेरी किरणे दिसत असतानाच बहुतांशी ठिकाणी दीप लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र उत्साह दिसून आला. बळीराजा दिवाळीचा सण अगदी आगळय़ावेगळय़ा पद्धतीने साजरा करतो. यंदाही सोमवारी आपल्या शिवारातील पिकामध्ये जाऊन पांडव पूजा केली.
दिवाळीची आगळीवेगळी परंपरा आजही कायम
तालुक्यातील पिरनवाडी, मच्छे, बेळगुंदी, बिजगर्णी, राकसकोप, कडोली, बस्तवाड, हलगा, देसूर आदी ठिकाणी असलेल्या विविध प्रकारच्या दुकानांमध्ये तसेच काही कारखान्यांमध्येही लक्ष्मीपूजन भक्तिभावाने करण्यात आले. शिवारात पांडव पूजा करताना भाताची बहरलेली लोंबे आणून ग्रामदैवत, कुलदैवत आदी ठिकाणी ही लोंबे ठेवून पूजा केली.
पहिलं पीक, धान्य पूजेच्या स्वरुपाने देवाला अर्पण करण्याची ही आगळीवेगळी परंपरा आजही जपण्यात आली आहे. लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य उद्यमबाग, पिरनवाडी आदी परिसरात खरेदी करताना नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.5 ऊस 50 ते 60 रुपये याप्रमाणे खरेदी करण्यात येत होते. केळीची लहान 4 झाडे 70 ते 150 रुपये याप्रमाणे विक्री सुरू होती.