कपडे व लक्ष्मी पूजनचे साहित्य खरेदीसाठी गर्दी
वार्ताहर/ कराड
वर्षातील सर्वात मोठय़ा दिवाळी सणास शुक्रवारी वसुबारसने प्रारंभ झाल्यानंतर आज सोमवारी अभ्यंगस्नान व लक्ष्मी पूजन होत आहे. त्यानिमित्त रविवारी लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला कराडच्या बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. कपडय़ांची दुकाने ग्राहकांनी ओसंडून वाहात होती. तर लक्ष्मी पूजनाचे साहित्य, झेंडुची फुले, रांगोळी आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यावर्षीचा दिवाळी सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जवळपास पंधरा दिवसांपासून कराडची बाजारपेठ दिवाळी साहीत्याने सजली होती. तर आठवडाभरापासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होती. रविवारी लक्ष्मी पूजनच्या पूर्वसंधेला ग्राहकांनी बाजारपेठ ओसंडून वाहात होती. प्रामुख्याने कापड दुकानांत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. कपडे खरेदीसाठी नागरिक सहकुटुंब बाहेर पडत असल्याने जवळपास सर्वच कापड दुकाने हाऊस फुल्ल होती.
मुख्य बाजारपेठेसह शहरातील चौकाचौकात व रस्त्यावर रांगोळी, पणत्या व झेंडुची फुले विक्रीसाठी आली होती. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात झेंडुची दुकाने थाटल्याने दत्त चौक पिवळा धमक दिसत होता. रांगोळी व पणत्या खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणारी गर्दी पाहता वाहतूक पोलिसांच्या वतीने परफेक्ट नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला