वृत्तसंस्था/ पॅरिस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरिस मास्टर्स खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सीडेड कार्लोस अल्कारेझ तसेच सर्बियाचा माजी टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविच यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 6-1, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये 72 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. 2022 च्या टेनिस हंगामामध्ये अल्कारेझने यापूर्वी दोन मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या असून आता तो तिसरी मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस टय़ुरिनमध्ये एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी स्पेनचा अल्कारेझ एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान भक्कम राखेल. 19 वषीय अल्कारेझने अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. अल्कारेझचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना डेन्मार्कच्या होल्गेर रुनेशी होणार आहे. डेन्मार्कच्या रुनेने रशियाच्या सातव्या मानांकित आंदे रुबलेव्हचा 6-4, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सर्बियाच्या माजी टॉप सीडेड जोकोविचने रशियाच्या कॅचेनोव्हचे आव्हान 6-4, 6-1 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. जोकोविचने आतापर्यंत 21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली असून त्याचबरोबर त्याने विक्रमी 38 मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मुसेटीशी होणार आहे. जोकोविचने अलीकडच्या कालावधीत विविध स्पर्धांमध्ये सलग 18 एकेरी सामने जिंकले आहेत.
इटलीच्या मुसेटीने नॉर्वेच्या तृतीय मानांकित कास्पर रुडचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 20 वषीय मुसेटी आणि जोकोविच यांच्यात लढत होईल. कॅनडाच्या फेलिक्स ऍलिसिमेने गिलेस सिमॉनचा 6-1, 6-3 तसेच अमेरिकेच्या टिफोईने ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.