वृत्तसंस्था/ मेलबोर्न
पुढील महिन्यात येथे होणाऱया 2023 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचचे पुनरागमन होणार असून त्याचे टेनिस शौकिनांकडून जोरदार स्वागत अपेक्षित आहे.
जोकोविचने आपल्या टेनिस कारकिर्दीला आजपर्यंत दर्जेदार आणि साजेसा खेळ केला असून त्याने आतापर्यंत नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी कोरोना समस्या संदर्भात लसविषयी नियमावली काटेकोरपणे बजावण्यात आली होती. पण जोकोविचला या नियमांचे पालन करता न आल्याने तो सहभागी झाला नव्हता. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याकरिता जोकोविचवर प्रवेश बंदी करण्यात आली होती. आता तो या स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या टेनिस इतिहासात नदालने विक्रमी 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्याच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी जाकोविचला आणखी एक जेतेपद मिळविणे जरुरीचे आहे. 2022 च्या टेनिस हंगामात त्याने ऍस्टेना, टय़ुरीन, येथील एटीपी स्पर्धा जिंकल्या तर पॅरिस मास्टर्स स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. 35 वर्षीय जोकोविच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहील.