वृत्तसंस्था/ टय़ुरीन (इटली)
2022 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या वर्षअखेरीच्या पुरुषांच्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविच आणि नॉर्वेचा चौथा मानांकित कास्पर रुड यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने अमेरिकेच्या टेलर फ्रिजचे आव्हान 7-6(7-5), 7-6(8-6) असे संपुष्टात आणले. मात्र, जोकोविचला विजयासाठी फ्रिजने चांगलेच झगडविले. जोकोविचने एटीपी टूरवरील फायनल्स स्पर्धा आतापर्यंत पाचवेळा जिंकली असून स्वीसचा निवृत्त झालेला टेनिसपटू रॉजर फेडररने सदर स्पर्धा विक्रमी सहावेळा जिंकली आहे. फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी जोकोविचला यावेळी जेतेपद मिळवावे लागेल. उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित जोकोविचने 21 तर फ्रिजने 31 विजयी फटके नोंदवले. जोकोविचने ही स्पर्धा यापूर्वी 2008, 2012, 2013, 2014 आणि 2015 साली जिंकली होती.
या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात नॉर्वेचा चौथा मानांकित टेनिसपटू कास्पर रुडने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा 6-2, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. रुडने हा उपांत्य सामना केवळ 69 मिनिटात जिंकला. या सामन्यात रुडने 20 विजयी फटके मारले. एटीपी टूरवरील स्पर्धेत चालू वर्षामध्ये रुडचा हा 51 वा विजय आहे.