विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम ः दुहेरीत सानिया- पेव्हिक, व्हिनस- जेमी मरे यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ लंडन (ब्रिटन)
2022 विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत सर्बियाचा जोकोविच तसेच इटलीचा सिनेर यांनी पुरूष एकेरीत त्याचप्रमाणे टय़ुनेशियाची जेबॉर, बेल्जियमची मर्टन्स यांनी महिला एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. अमेरिकेचा जॉन इस्नेर, केमानोव्हिक, जर्मनीची केर्बर आणि ग्रीसची सॅकेरी यांचे आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि पेव्हिक तसेच अमेरिकेची व्हिनस विल्यम्स आणि जेमी मरे यांनी विजयी सलामी दिली.
शुक्रवारी या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात सहावेळा आतापर्यंत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचने आपल्याच देशाच्या केमानोव्हिकचा 6-0, 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना जवळपास दोन तास चालला होता. आता जोकोव्हिचचा चौथ्या फेरीतील सामना वाईल्डकार्डधारक हॉलंडच्या रिजेटोव्हीनशी होणार आहे.
पुरूष एकेरीच्या तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात इटलीच्या सिनेरने अमेरिकेच्या जॉन इस्नेरवर 6-4, 7-6 (7-4), 6-3 अशी मात करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. विम्बल्डन स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविणारा इटलीचा सिनेर हा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू ठरला आहे. सिनेरचा चौथ्या फेरीतील सामना स्पेनच्या अलकॅरेझशी होणार आहे. स्पेनच्या ऍलकॅरेझने ऑस्कर ओटीचा 6-3, 6-1, 6-2 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या तिसऱया फेरीतील सामन्यात टय़ुनेशियाच्या जेबॉरने फ्रान्सच्या डायनी पॅरीचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत चौथी फेरी गाठली. अलिकडच्या कालावधीत जेबॉरने एकेरीतील सलग आठ सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या सामन्यात जेबॉरने दोन्ही सेटमध्ये पहिले सलग पाच गेम्स जिंकले.
दुसऱया एका सामन्यात बेल्जियमच्या 24 व्या मानांकित इलेसी मर्टन्सने जर्मनीच्या 15 व्या मानांकित अँजेलिक केर्बरवर 6-4, 7-5 अशी मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे जर्मनीच्या मारियाने ग्रीसच्या पाचव्या मानांकित सॅकेरीचे आव्हान 6-3, 7-5 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. कॅरोलिनी गार्सियाने 2017 नंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेत चौथी फेरी गाठली असून तिसऱया फेरीतील सामन्यात तिने 33 व्या मानांकित झेंग शुईचा 7-6 (7-3), 7-6 (7-5) असा पराभव केला.
सानियाची दुहेरीत विजयी सलामी
मिश्र दुहेरीच्या शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियाचा साथीदार मॅटे पेव्हिक यांनी विजयी सलामी देताना जॉर्जियाची नाताली डिलेमडेझीचा आणि स्पेनचा डेव्हिड हेर्नांझे यांचा 6-4, 3-6, 6 (10)-6 (3) असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना दोन तास चालला होता. भारताची सानिया मिर्झाने विम्बल्डन ग्रॅडस्लॅम स्पर्धेनंतर टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा यापूर्वीच केली आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये सानिया आणि तिची झेकची साथीदार हर्डेस्का यांना पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. 2015 साली भारताच्या 35 वर्षीय सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीससमवेत महिला दुहेरीचे पहिले विजेतेपद पटकाविले होते.
मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेची व्हिनस विलीयम्स आणि तिचा ब्रिटनचा साथीदार जेमी मरेने ऍलीसिया रोसोलस्का आणि मिचेल व्हिनस यांचा 6-3, 6-7 (3-7), 6-3 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.