Tarun Bharat

विम्बल्डनमध्ये जोकोविच, स्वायटेकला अग्रमानांकन

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला पुढील आठवडय़ात सुरुवात होत असून पुरुष एकेरीत विद्यमान चॅम्पियन नोव्हॅक जोकोविचला मेदवेदेव्ह व अलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्या गैरहजेरीत पहिले सीडिंग देण्यात आले आहे. रशियन खेळाडू डॅनील मेदवेदेव्हला या स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली आहे तर व्हेरेव्ह दुखापतीमुळे या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. महिलांमध्ये पोलंडच्या इगा स्वायटेकला अग्रमानांकन मिळाले आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने रशिया व बेलारुसच्या खेळाडूंना विम्बल्डनमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्याचा निर्णय आयोजकांनी याआधीच जाहीर केला होता. त्यामुळे मेदवेदेव्ह या स्पर्धेत सहभागी होणार नाही. प्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य लढतीवेळी व्हेरेव्हचा घोटा दुखावला होता. त्यातून तो अद्याप बरा झालेला नाही. कोव्हिड लसीकरण केले नसल्याने जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. त्यामुळे त्याला त्या स्पर्धेचे जेतेपद राखण्यापासून वंचित व्हावे लागले आणि 2000 मानांकन गुणांनाही मुकावे लागले.    याचा फटका त्याला मानांकनात बसल्याने मेदवेदेव्हने त्याला मागे टाकत अग्रमानांकन मिळवले होते. जोकोविचने मागील तीन वेळा ग्रासकोर्टवरील ही स्पर्धा जिंकली असून एटीपी व डब्ल्यूटीएने या स्पर्धेला मानांकन गुण न देण्याचा निर्णय घेतल्याने त्याला आणखी 2000 मानांकन गुण गमवावे लागतील. त्यामुळे जागतिक मानांकनात त्याची आणखी घसरण होणार आहे.

मेदवेदेव्ह व व्हेरेव्ह यांच्या अनुपस्थितीत स्पेनच्या राफेल नदालला कॅलेंडर स्लॅम साधण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याची संधी मिळाली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन व पेंच ओपन स्पर्धा जिंकून ग्रँडस्लॅम साधण्याच्या दिशेने अर्धी मजल मारली आहे. नदालला येथे दुसरे मानांकन मिळाले आहे. जोकोविच व नदाल दोन वेगळय़ा हाफमध्ये असल्याने ते अंतिम फेरीआधी एकमेकाविरुद्ध खेळू शकणार नाहीत. त्यामुळे जेतेपदाची त्यांच्यात होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. पेंच ओपनमध्ये या दोघांची लढत उपांत्यपूर्व फेरीत झाली होती आणि त्यात नदालने बाजी मारली होती.

येथील पहिल्या दहांमध्ये ब्रिटनच्या दोन खेळाडूंना स्थान मिळाले असून कॅमेरॉन नोरीला नववे तर अमेरिकन ओपन महिला चॅम्पियन एम्मा रॅडुकानूला बेलारुसच्या आर्यना साबालेन्का नसल्यामुळे महिला एकेरीत दहावे स्थान मिळाले आहे. पोलंडच्या जागतिक अग्रमानांकित इगा स्वायटेकला या स्पर्धेतही अग्रस्थान देण्यात आले असून इस्टोनियाच्या ऍनेट कोन्टाव्हेटला दुसरे मानांकन मिळाले आहे.

मागील दोन वर्षातील ग्रासकोर्ट स्पर्धांतील कामगिरी पाहून संगणकाच्या आधारे विम्बल्डन आयोजक खेळाडूंचे मानांकन निश्चित करीत असत. पण 2021 पासून त्यात बदल करून जागतिक क्रमवारीच्या आधारावरच मानांकन ठरविण्यात येत आहे.

रामकुमार, भांब्री यांचे पात्र फेरीतच आव्हान समाप्त

भारताचे एकेरीचे खेळाडू पुन्हा एकदा विम्बल्डन पात्रता फेरी ओलांडण्यात अपयशी ठरले असून रामकुमार रामनाथन व युकी भांब्री या दोघांनाही पात्रतेच्या पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. भांब्रीला अग्रमानांकित स्पेनच्या बर्नाबे झपाटा मिरॅलेसकडून 5-7, 1-6 तर रामकुमारला झेक प्रजासत्ताकच्या 19 व्या मानांकित व्हिट कोप्रिव्हाकडून 5-7, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. भांब्रीने मिरॅलेसविरुद्ध जोरदार सुरुवात करीत 5-3 अशी मजल मारली होती. तो ऍडव्हांटेज स्थितीत असताना त्याने दोनदा सेट पॉईंट्स गमविले आणि नंतर मिरॅलेसने पकड मिळवित हा सेट घेतला. मिरॅलेसने दुसरा सेट आरामात घेत आगेकूच केली. भारताचा अव्वल खेळाडू रामकुमारनेही सुरुवात चांगली केली. पण नंतर त्याला तो जोम टिकविता आला नसल्याने पराभवाला सामारे जावे लागले. मानांकन गुण मिळणार नसल्याने रोहन बोपण्णाने यावर्षी विम्बल्डनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे तर सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय या स्पर्धेत खेळताना दिसेल. महिला दुहेरीत ती झेकच्या ल्युसी ऱहॅडेकासमवेत खेळणार आहे.

Related Stories

दिल्लीविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याची राजस्थानला संधी

Patil_p

पाकची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

मोठय़ा विजयासह भारत उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

जमैकाच्या शेली ऍन प्रेजर प्राईसला सुवर्ण,

Patil_p

जडेजा-अश्विनवर आमचा फोकस असेल

Amit Kulkarni

नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन पाचव्यांदा विश्वविजेता

Patil_p
error: Content is protected !!