वृत्तसंस्था/ पॅरिस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरिस मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या माजी टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविचने तसेच ग्रीकच्या सित्सिपेस यांनी एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. मात्र, स्पेनचा टॉप सीडेड कार्लोस अल्कारेझचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच दुखापतीमुळे समाप्त झाले.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने इटलीच्या लोरेन्झो मुसेटीचा 6-0, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात ग्रीकच्या सित्सिपेसने अमेरिकेच्या टॉमी पॉलचे आव्हान 6-2, 6-4 असे संपुष्टात आणत उपांत्यफेरी गाठली. कॅनडाच्या ऍलिसिमेने आपली विजयी घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या टायफोवर 6-1, 6-4 अशी मात केली. स्पेनच्या टॉप सीडेड अल्कारेझला दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होण्यापूर्वी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. अल्कारेझने स्पर्धेतून माघार घेतल्याने होल्गेर रुनेला उपांत्य फेरीसाठी पुढे चाल मिळाली.