वृत्तसंस्था/ मेलबॉर्न
ऑस्ट्रेलियन ओपनचा पुरुष एकेरीतील अंतिम सामना आज रविवारी नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात मेलबर्न पार्कमध्ये रंगणार असून जोकोविचा या लढतीत आपले दहावे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद मिळविण्यासाठी जोर लावणार आहे. ग्रँडस्लॅमच्या पूर्वसंध्येला कोविड-19 लसीकरणाच्या अभावी ऑस्ट्रेलियातून हद्दपार केल्यानंतर एक वर्षाने जोकोविचने या स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केलेले आहे. धोंडशिरेची दुखापत, बंदी घातलेले रशियन झेंडे फडकवणाऱया चाहत्यांमध्ये वडील मिसळल्याने मीडियात उठलेले वादळ या सर्वांचा सामना करत त्याची विजयी घोडदौड कायम राहिलेली अहे.
शुक्रवारी अमेरिकी खेळाडू टॉमी पॉलवर उपांत्य फेरीत मिळविलेल्या विजयाने त्याच्या विजयोची मालिका 27 वर गेली असून 2000 ते 2004 दरम्यान आंद्रे अगासीने नोंदविलेल्या 26 विजयांच्या मालिकेला त्याने मागे टाकले आहे. उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर हा सर्बियन खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कधीही पराभूत झालेला नाही. हा अंतिम सामना म्हणजे 2021 च्या प्रेंच ओपन फायनलची पुनरावृत्ती आहे. त्या लढतीत जोकोविचने दोन सेटनी पिछाडीवर पडल्यानंतरही विजेतेपद हिसकावून घेतले होते. 35 वर्षीय जोकोविचला नदालच्या 22 ग्रँडस्लॅम किताबांशी बरोबरी साधण्यासाठी एका विजेतेपदाची आवश्यकता आहे. दरम्यान, तिसरा मानांकित त्सित्सिपासही ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा पहिला ग्रीक खेळाडू होण्यासाठी उत्सुक आहे.