अल्कारेझ, ओस्टापेन्को यांचे आव्हान समाप्त
अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने हॉलंचा वाईल्डकार्ड प्रवेशधारक टिम व्हान रिथोव्हेनची स्वप्नवत घोडदौड चौथ्या फेरीत संपुष्टात आणत विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर इटलीच्या यानिक सिनेरने स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझला पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. याशिवाय कॅमेरॉन नोरी, गॉफिन, ऑन्स जेबॉर, रिबाकिना यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली तर ओस्टापेन्को, एलिस मर्टेन्स, वॅटसन, फ्रान्सेस टायफो यांचे आव्हान संपुष्टात आले.
जोकोविचने रिथोव्हेनवर 6-2, 4-6, 6-1, 6-2 अशी मात केली. जोकोविचने ही स्पर्धा सातवेळा जिंकली असून सलग चौथ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. 2017 मधील उपांत्यपूर्व फेरीनंतर तो या स्पर्धेत अद्याप अपराजित राहिला आहे. त्याची उपांत्यपूर्व लढत इटलीच्या दहाव्या मानांकित यानिक सिनेरशी होईल. 20 वर्षीय सिनेरने पाचव्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझवर मात करून त्याचे आव्हान संपुष्टात आणले. सिनेरने ही लढत 6-1, 6-4, 6-7 (8-10), 6-3 अशी जिंकली. 2014 मध्ये या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा निक किर्गिओस हा सर्वात युवा खेळाडू बनला होता. त्यानंतर सिनेरने हा मान मिळविला आहे.
नवव्या मानांकित ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीने उपांत्यपूर्व फेरी गाठत ब्रिटिनचे आव्हान जिवंत ठेवले आहे. ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याने अमेरिकेच्या टॉमी पॉलवर 6-4, 7-5, 6-4 अशी मात केली. त्याची पुढील लढत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनविरुद्ध होईल. गॉफिनने अमेरिकेच्या 23 व्या मानांकित फ्रान्सेस टायफोला 7-6 (7-3), 5-7, 5-7, 6-4, 7-5 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. हा सामना तब्बल 4 तास 36 मिनिटे रंगला होता. गॉफिनने यात 18 बिनतोड सर्व्हिस केल्या. यावर्षीच्या विम्बल्डनमधील हा सर्वात दीर्घ काळ चाललेला सामना होता.
वॅटसन, ओस्टापेन्को पराभूत
महिला एकेरीत जर्मनीच्या ज्युल नीमियरने ब्रिटनच्या हीदर वॅटसनला चौथ्या फेरीतच स्पर्धेबाहेर घालविले. तिने हा सामना 6-2, 6-4 असा जिंकला. नीमियरची ही दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असून तिने तिसऱया मॅचपॉईंटवर उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. जर्मनीच्याच ताताना मारियाने स्वप्नवत घोडदौड पुढे चालू ठेवताना माजी पेंच चॅम्पियन 12 व्या मानाकित एलेना ओस्टापेन्कोचे आव्हान 5-7, 7-5, 7-5 असे संपुष्टात आणत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिची पुढील लढत तिचीच देशवासी ज्युल नीमियरशी होईल. जागतिक द्वितीय मानाकित ऑन्स जेबॉरने सलग दुसऱयांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना 24 व्या मानांकित एलिस मर्टेन्सचा 7-6 (11-9), 6-2 असा पराभव केला. कझाकस्तानच्या इलेना रिबाकिनानेही आगेकूच करताना पेत्रा मार्टिकचा 7-5, 6-3 असा पराभव केला.